बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षापासून साधेपणाने साजरा केला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोरोनाचे निर्बंध यावेळी शिथील झाल्याने मोठ्या जल्लोषात व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
जयंतीच्या पूर्वसंध्येला व जयंती दिवशी असे दोन दिवस डॉ. आंबेडकर अनुयायांचा जनसागर बारामतीमध्ये लोटला होता.
बारामती शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजता धार्मिक पूजापाठाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे, तहसीलदार विजय पाटील यांच्या हस्ते डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, भारत अहिवळे, इम्तियाज शिकिलकर, माजी नगरसेवक सुभाष ढोले, बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खासगी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, गणेश सोनवणे, नवनाथ बल्लाळ, बिरजू मांढरे, आरती शेंडगे ,अनिता जगताप, मयुरी शिंदे, शुभम अहिवळे, बसपाचे राज्य सचिव काळूराम चौधरी, अप्पा अहीवळे, मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. विनोद जावळे, प्रा. रमेश मोरे, राजेंद्र सोनवणे,आदिंसह इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने सलामी देऊन डॉ आंबेडकर यांना सलामी देण्यात आली. शरयू फाउंडेशनचे अध्यक्ष शर्मिला पवार यांनी देखील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दरम्यान, जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध भागातील जयंती उत्सव मंडळांनी रॅली काढून जल्लोष केला. डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली. यावेळी आकर्षक रोषणाईने संपूर्ण बारामती परिसर उजळून निघाला होता. शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स व स्वागत कमानी उभारून डॉ आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. १४ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
यावेळी आंबेडकर अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सामूहिक पूजा पाठाचा कार्यक्रम संपन्न झाला. बारामती शहरातील चंद्रमणी नगर बुद्ध विहार, पंचशील नगर, सटवाजी नगर यासह इतर अनेक भागांमध्ये जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बारामती शहरात पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी सहा वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये बारामती शहर व परिसरासह इतर अनेक ठिकाणाहून आलेले हजारो भीम अनुयायी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. बारामती शहरात बारामती नगरपालिका, प्रांत व तहसील कार्यालय, उर्जा भवन तसेच शाळा व महाविद्यालये या ठिकाणी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
तालुक्यातील माळेगाव बुद्रुक या ठिकाणी डॉ. आंबेडकर जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भवानीनगर व सणसर याठिकाणी देखील विविध उपक्रमांनी जयंती साजरी करण्यात आली. भवानीनगर येथील अजिंक्य तरुण मंडळाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सणसर याठिकाणी डॉ. आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती राजेंद्र महादेव चव्हाण यांनी दिली.