बीड : देशभरामध्ये लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभा निवडणूकीचा अंतिम टप्पा सुरु असून सहा टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. येत्या 4 जून रोजी देशाचे राजकीय भवितव्य ठरणारा निकाल लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडले आहे. बीडमधील मतदान पार पडल्यानंतर देखील तिथे राजकीय नाट्य सुरुच आहे. बीडमधून महाविकास आघाडीकडून बजरंग सोनावणे तर महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यानंतर आता बजरंग सोनावणे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली असून तक्रार दाखल केली आहे.
सध्या सोशल मीडियावर बोगस मतदानाच्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत. बीडमधील बोगस मतदानाच्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे हे निवडणूक आयोगाकडे गेले आहेत. सोनावणे यांनी आयोगाला पत्र लिहित तक्रार केली आहे. बीड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील इतर अधिकाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत भाग घेऊ देऊ नये, असा उल्लेख करत त्यांनी राज्याच्या निवडणूक विभागाला पत्र लिहिले आहे.
पत्रात नेमकं काय?
निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात बजरंग सोनवणे यांनी लिहिले आहे की, मी बजरंग मनोहर सोनवणे 39 बीड लोकसभा या मतदार संघातून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांचा उमेदवार म्हणून उभा आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ, मुंडे, व्यंकटेश मुंडे तहसिलदार परळी वैजनाथ, दहिफळे पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन सिरसाळा, बांगर पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन, बीड, या अधिकाऱ्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये आपले कर्तव्य निष्ठेने, पारदर्शकतेने व निपक्षःपणे बजावले नसल्यामुळे आणि बहुतांशी अधिकारी बीड जिल्हयातीलच रहिवाशी असल्यामुळे मतमोजणी प्रक्रियेमध्ये बीड जिल्ह्यातच काम कसे करु शकतात ? ही बाब बेकायदेशीर असून त्यामुळे मतमोजणी प्रभावित होण्याची दाट शक्यता आहे.’ असे बजरंग सोनानणे यांनी पत्रात लिहिले आहे.