
Baramati Agro, Rohit Pawar, MPCB Notice,
Baramati News: इंदापूर तालुक्यातील शेळफळगडे येथील बारामती अॅग्रो लिमिटेड या आमदार रोहित पवार यांच्या साखर कारखान्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये कारखान्याला ७ दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास पाणी (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९७४ व वायू (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण) अधिनियम, १९८१ अंतर्गत कोणतीही पूर्वसूचना न देता कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक रहिवासी सागर संजय वाबळे व चांगण वाबळे यांनी केलेल्या तक्रारीनंतर तसेच भाजप युवा मोर्चाने केलेल्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ३ जुलै २०२६ रोजी कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीत कारखान्याकडून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. मंडळाच्या अहवालानुसार सुमारे दोन एकरांच्या कच्च्या तलावात प्रक्रिया न केलेले काळपट औद्योगिक सांडपाणी साठविण्यात आले होते. या तलावातून सांडपाणी झिरपत सिंचन कालव्यात जात असल्याचे तसेच पाईपद्वारे सांडपाणी कालव्यात सोडले जात असल्याचे आढळले.
याशिवाय लायनिंग खराब अवस्थेत असल्याने भूजल व परिसरातील विहिरींना धोका निर्माण झाला असून, हायड्रोक्लोरिक अॅसिडची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक न केल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढल्याचे मंडळाने नमूद केले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे विभागाचे प्रादेशिक अधिकारी बाळासाहेब महिपतराव कुकडे यांनी ६ जुलै २०२६ रोजी ही नोटीस जारी केली असून, निर्धारित मुदतीत समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास कारखान्याविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना भाजपा युवा मोर्चा पुणे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारवाईचे स्वागत केले. “पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या कोणालाही कायद्यापासून सूट मिळता कामा नये. नियमांचे उल्लंघन सुरूच राहिल्यास आणि दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर जनतेला सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जगदीश कोळेकर आणि संदीप केसकर उपस्थित होते.