कल्याण : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रेच्या” दुसऱ्या टप्प्यात दि. १५, १६ व १७ डिसेंबर रोजी कल्याण डोंबिवली महापालिकेतील विविध प्रभागात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक १६ डिसेंबर रोजी दुपारच्या सत्रात दु. ३ ते ५.३० वेळेत कर्मवीर दादासाहेब गायकवाड मैदान, सिध्दार्थ नगर, कल्याण (पूर्व) येथे संपन्न होणाऱ्या कार्यक्रमात केंद्रीय राज्य मंत्री, पंचायती राज, भारत सरकार कपिल पाटील तसेच आमदार व इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या उपक्रमात आयोजित कार्यक्रमाच्या ठिकाणी आयुष्यमान भारत, पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, खेलो इंडिया, पीएम उज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, पीएम आवास योजना, अटल मिशन फॉर रिज्युवनेशन (अमृत), पीएम भारतीय जन औषधी योजना, आधारकार्ड अपग्रेडेशन इ. योजनांची माहिती देणेकरीता स्टॉल्सची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच या सर्व कार्यक्रमाच्या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून देण्यासाठी डिजीटल स्क्रिन असणारी सुसज्य व्हॅन देखील उपलब्ध राहणार आहे.
हे अभियान पहिल्या टप्प्यात महापालिका क्षेत्रात दि. ५, ६ व ७ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालय कल्याण, आय प्रभाग कार्यालय, ड प्रभाग कार्यालय, बल्याणी, गांवदेवी मंदिर डोंबिवली (पू.), आनंद नगर उद्यान डोंबिवली (प.) या परिसरात राबविण्यात आले. विकसित भारत संकल्प यात्रेचे दि.१५ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान महापालिका क्षेत्रात संपन्न होणारे कार्यक्रम १५ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात मोरया नगरी, आशेळे, कल्याण (पूर्व) व दुपार सत्रात आयरेकर चौक, आयरेगांव, डोंबिवली (पूर्व). १६ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात खडेगोळवली, विठ्ठल मंदीर चौक, कल्याण (पूर्व) व दुपार सत्रात कर्मवीर दादासाहेब गायकवाड मैदान, सिध्दार्थ नगर, कल्याण (पूर्व).
१७ डिसेंबर रोजी सकाळ सत्रात सेंट लॉरेन्स इंटरनॅशनल स्कुल जवळ, ऊंबर्डे रोड, कल्याण (पश्चिम) व दुपार सत्रात गफुर डोन चौक, कल्याण (पश्चिम) याठिकाणी होणार आहे. तरी या कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरीकांनी, लाभार्थ्यांनी आवार्जुन उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
Web Title: Bharat sankalp yatra developed in kalyan east in the presence of union minister kapil patil kalyan dombivli municipal corporation