भाईंदर/विजय काते :- मीरारोडच्या शांतीपार्क परिसरात असलेल्या ‘जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन’ या दुकानाच्या मालकास केवळ भाषेच्या मुद्द्यावरून मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याच्या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत आज संपूर्ण मीरा-भाईंदर शहरातील व्यावसायिकांनी एकत्र येत स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवत आपला निषेध नोंदवला.ही घटना केवळ एका व्यक्तीपुरती मर्यादित न राहता भविष्यात कोणत्याही व्यावसायिकासोबत घडू शकते, अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये पसरली आहे. त्यामुळे व्यापार क्षेत्रात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, प्रशासनाकडून ठोस कृतीची मागणी जोर धरू लागली आहे.
आज सकाळपासूनच सेव्हन इलेव्हन शाळेसमोर मोठ्या प्रमाणात व्यापारी, व्यावसायिक संघटना, महिला व स्थानिक नागरिक एकवटले. व्यापाऱ्यांनी “व्यवसायाला संरक्षण मिळालंच पाहिजे”, “दादागिरीखोरांवर कठोर कारवाई करा”, अशा जोरदार घोषणा देत रस्त्यावरच आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांनीही पुढाकार घेतला आणि मनसेच्या कार्यकर्त्यांच्या गुंडगिरीला विरोध दर्शवला.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन व्यापाऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी स्पष्टपणे सांगितले की,“शहरात समाजात तेढ निर्माण करणारे कोणतेही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतील, तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. दोषींना कोणतीही गय केली जाणार नाही.”पोलीस यंत्रणा सद्य:स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, संबंधित आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.
दुकानदारास झालेली मारहाण ही केवळ भाषिक भेदाच्या कारणावरून करण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याने शहरातील इतर भाषिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “जर एखाद्या दुकानाच्या पद्धतीवरून कोणालाही मारहाण करण्याचं स्वातंत्र्य असेल, तर आमचं अस्तित्वच धोक्यात आहे,” अशा शब्दांत व्यापाऱ्यांनी आपली व्यथा मांडली.
व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे काही ठोस मागण्या मांडल्या आहेत:आरोपींवर तत्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी.व्यावसायिकांना संरक्षण देणारी योजना लागू करावी.राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांची दुकानदारांवरील दबावगिरी थांबवण्यासाठी आदेश निघावेत.सध्या पोलीस प्रशासन या प्रकरणात तपास करत असून, पुढील काही दिवसांत काय कारवाई होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.