महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ; मुख्यमंत्र्यांबाबत अमित शहांचे विधान
मुंबई : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा या राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. त्यात हरियाणामध्ये भाजपला चांगले यश मिळाले असून, आता तिथं सरकार स्थापन केले जाणार आहे. त्यातच आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सूचक विधान केल्याने महायुतीमध्ये मोठा भाऊ असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.
देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदे फक्त व्यवस्था आहे. ती सरकारची कामे पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिले. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असे सूचक विधान अमित शाह यांनी केल्याची माहिती आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक जागावाटपात अधिकच्या जागा भाजपच्या पदरात पडणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अमित शाह यांच्या या वक्तव्यामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नक्की किती जागा दिल्या जाणार? शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रिपद दिले जाणार का, असे प्रश्नही अमित शाह यांच्या या विधानामुळे उपस्थित होत आहेत.
शिंदेंनी मोठ्या मनाने त्याग करावा : बावनकुळे
एकनाथ शिंदे मन मोठे करत आमच्याकडे आले. अजितदादाही त्रासाला कंटाळून आले, त्यांचाही त्याग आहे. महायुती स्थापन करताना सर्वांचाच त्याग आहे. मात्र, कोणाचा किती त्याग, याचे परिमाण लावता येत नाही. त्यामुळे आता ती वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने आणखी त्याग करावा, असा सल्ला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.