Muralidhar Mohol met Raj Thackeray
पुणे : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे नेत्यांची बोलणी, सभा आणि बैठका यांचे सत्र वाढले आहे. राजकीय चर्चांना वेग आला असून अनेक नेते आपापली भूमिका स्पष्ट करत आहेत. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधून येत्या विधानसभा निवडणुकीनंतर मनसे पक्ष सत्तेमध्ये असेल असे वक्तव्य केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले. त्याचबरोबर महायुती व महाविकास आघाडीची चिंता वाढली. यानंतर आता मनसे नेते राज ठाकरे यांच्या मनवळवणीची प्रयत्न सध्या सुरु आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री हे राज ठाकरेंशी भेट घेणार आहेत.
राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे पक्ष हा पूर्ण ताकदीने लढत देणार आहे. तसेच इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा मनसे सर्वात जास्त जागा लढवणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर विधानसभेनंतर मनसे पक्ष सत्तेमध्ये असेल असे देखील वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. तसेच कोणत्या युतीसोबत लढणार की एकटेचे स्वबळावर निवडणूका लढवणार हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे सर्वांची काळजी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. मोहोळ आणि राज ठाकरे यांच्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मतदारसंघाची चाचपणी देखील मनसेकडून सुरु आहे. तर आता दुसऱ्या बाजूला भाजप नेते मुरलीधर मोहोळ हे राज ठाकरेंच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. पुण्याचा सर्व मतदारसंघाचा आढावा हा राज ठाकरेंकडून घेण्यात येत आहे. त्यामुळे शिवतिर्थावर मनसेचे पुण्यातील 10 नेते ही शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. त्यामुळे पुणे मनसेचे दोन शहरप्रमुख, 6 राज्य सरचिटणीस, 2 प्रवक्ते देखील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. त्यामुळे आता पुण्यातील विधानसभा मतदारसंघाबाबत मुरलीधर मोहोळ व राज ठाकरे यांच्य़ामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी मुरलीधर मोहोळ यांचा प्रचार केला होता. त्यामुळे आता विधानसभेमध्ये पुण्यामध्ये मनसेचे राजकीय भूमिका काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.