Maharashtra Election 2024: भाजप लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ॲक्शनमोडमध्ये; 'या' शिलेदारांना उतरवणार प्रचाराच्या मैदानात
राज्यात आगामी काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुतीतील सहभागी पक्ष देखील स्वतंत्रपणे किती जागा जिंकू शकतो किंवा कोणाला सत्ता मिळू शकते याचा अंतर्गत सर्व्हे करताना पाहायला मिळत आहे. तर लोकसभेत झालेला फटका टाळण्यासाठी भाजपने मेगा प्लॅन तयार केला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मैदानात उतरवले अशी आग्रही भूमिका संघाने घेतली होती.
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप प्रचारासाठी व इतर नियोजनासाठी चार मंत्र्यांना मैदानात उतरवणार आहेत. प्रचाराची जवाबदारी चार प्रमुख नेत्यांकडे सोपविली जाणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे भाजपच्या प्रचाराची जवाबदारी दिली जाणार आहे. नितीन गडकरी यांच्याकडे विशेष प्रचारप्रमुख म्हणून जवाबदारी असणार आहे. पूर्ण एक महिना गडकरी संपूर्ण महाराष्ट्र भाजपच्या प्रचारासाठी पालथा घालणार आहेत.
निवडणूक समितीचे प्रमुखपद, संयोजक हे रावसाहेब दानवे असणार आहेत. विधानसभेच्या प्रचारासाठी आता भाजपने मेगा प्लॅन केला आहे. नितीन गडकरी यांचा चेहरा विधानसभा निवडणूकीत वापरावा असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आग्रह होता. त्यांच्या चांगल्या प्रतिमेचा भाजपला राज्यात फायदा होईल असे संघाचा अंदाज आहे. नितीन गडकरी हे विशेष प्रचारक, रावसाहेब दानवे हे प्रमुख संयोजक तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.
येत्या आठवड्याभरात भाजपकडून २० स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ अशा बड्या नेत्यांचा या प्रचार समितीमध्ये समावेश केला जाऊ शकतो.
नितीन गडकरींना राज्याच्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय करावे असे संघाचे मत आहे. सद्य स्थितीस देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते सध्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी गडकरी-फडणवीस जोडी भाजपसाठी फायदेशीर ठरेल असे संघाला वाटत आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपमध्ये समन्वय राहावा यासाठी संघाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.