
भाजप आमदार सुरेश धस यांनी सत्कारच नाकारला; कारण देत म्हटलं...
धाराशिव : संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, असा निर्धार आमदार सुरेश धस यांनी केला आहे. धाराशिवमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सत्कार नाकारला. याचीच चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे.
हेदेखील वाचा : सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा मेथीच्या पाण्याचे सेवन, ३० दिवसांमध्ये शरीरात दिसून येतील सकारात्मक बदल
सध्या याच मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होताना दिसत आहेत. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शनिवारी मस्साजोगमध्ये जाऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची तसेच ग्रामस्थांची भेट घेतली. या भेटीनंतर आता त्यांनी रविवारी मोठी घोषणा केली. मंत्री जयकुमार गोरे यांची धाराशिवचे जिल्हासंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती. ही भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपण मुंडे यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी त्यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण या भेटीवर सुरेश धस यांनी दिले आहे.
शनिवारी सुरेश धस होते परळी दौऱ्यावर
शनिवारी सुरेश धस हे परळी दौऱ्यावर होते. त्यापूर्वी त्यांनी मस्साजोगमध्ये जाऊन पुन्हा एकदा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची आणि तेथील ग्रामस्थांची भेट घेतली. ग्रामस्थांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा देखील त्यांनी केला. परळी दौऱ्यात मात्र त्यांना विरोध झाल्याचे पाहायला मिळाले. सुरेश धस हे परळीचे नाव बदनाम करत असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले. जोरदार घोषणाबाजी करत त्यांना काळे झेंडे देखील दाखवण्यात आले.
…तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही
भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप आमदार सुरेश धस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, त्यांनी सत्कार नाकारला आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले.
हेदेखील वाचा : Top Marathi News today Live : माणिकराव कोकाटे यांच्या अपीलवर सत्र न्यायालयात होणार सुनावणी