Top Marathi News today Live
Marathi Breaking news live updates : अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे घरकुल घोटाळ्यामध्ये दोषी करार दिला होता. यामध्ये विद्यमान कृषीमंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजारांचा दंड सुनावण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांना अटकपूर्व जामीन मिळाला असली तरी कोकाटे यांनी शिक्षेविरोधात सत्र न्यायालयात अपील केलं आहे. याबाबत आज सत्र न्यायालामध्ये सुनावणी पार पडणार आहे. यामध्ये सत्र न्यायालयात कोकाटे यांची शिक्षा कायम राहणार की दिलासा मिळणार याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा रंगली आहे.
24 Feb 2025 05:47 PM (IST)
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सेशन कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सेशन कोर्टाने माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या शिक्षेला कोर्टाने स्थगिती दिली आहे.
24 Feb 2025 05:31 PM (IST)
दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर आपचं राजकीय भविष्य धोक्यात असल्याचं सांगितलं जात असतानाच आपच्या पंजाब सरकारबद्दल वेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांवर विधानसभेचे अधिवेशन आलेले असताना काँग्रेसचे नेते प्रताप सिंग बाजवा यांनी मोठा दावा केला आहे. आम आदमी पक्षाचे ३० ते ३५ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
24 Feb 2025 05:00 PM (IST)
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे. आज पंढरपूर मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने नीलम गोऱ्हे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत एक पद मिळवण्यासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागतात असे वादग्रस्त विधान केले होते.
24 Feb 2025 04:35 PM (IST)
बेळगाव येथील महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसला आडून वाहक आणि चालकाला काळे फासण्याचा प्रकार झाला होता. बेळगाव येथील प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदारपणे निषेध व्यक्त करण्यात आला. कानडी बस चालकाला हार आणि भगवा रंग लावून बेळगाव प्रकरणाचा शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यात आला.
24 Feb 2025 03:33 PM (IST)
हदगाव तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प हादगाव यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका मदतनीस या पदासाठी पद भरती सुरू झाली असून शैक्षणिक पात्रता बारावी पास असून विधवा महिलांसाठी दहा गुण जास्तीचे आहेत तर वय मर्यादा गावातल्या चाळीस वर्ष एकूण जागा 84 असून दिनांक 24 फेब्रुवारी 2025 ते 10 मार्च 2025 या कालावधीमध्येपात्र महिलांनी अर्ज भरावे असे आव्हान महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे यांनी केले आहे.
24 Feb 2025 03:21 PM (IST)
शहरातील मुख्य मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी उभारण्यात आलेल्या मेट्रो समांतर पुलांचे काम वेगाने पूर्ण होत असले तरी त्याच्या उद्घाटनास विलंब होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या प्रकरणी मिरा-भाईंदर काँग्रेस आक्रमक झाली आहे. युवक काँग्रेसचे सिद्धेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पुलाजवळ आंदोलन केले. "नागरिकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन पुलाचे त्वरित उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला करावा," अशी काँग्रेसने मागणी केली आहे.
24 Feb 2025 03:13 PM (IST)
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाचा सांप्रदायातील लोकांनी जाहीर निषेध केला. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या वेळेला शेकडो कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच त्याच्या फोटोला देखील जोड्यानी मारण्यात आले. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागातील,आसपासच्या परिसरातील अनुयायांनी मोठ्या संख्येने या निषेध मोर्चाला हजेरी लावली होती.
24 Feb 2025 02:49 PM (IST)
नीलम गोऱ्हे यांनी दोन मर्सिडिज दिल्या की ठाकरे गटामध्ये पद मिळते असा दावा केला होता. यावरुन आता राजकारण रंगले आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, प्रबोधनकार ठाकरे आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि अपार कष्टातून उभा राहिलेला शिवसेना हा पक्ष गोरगरिबांसाठी झटणारा आणि छोट्यातल्या छोट्या समूहाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष म्हणून ओळख आहे. नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक एक उदात्त आणि भव्यदिव्य परंपरा असणाऱ्या पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलीन करण्याच्या हेतूने काल अत्यंत बेताल वक्तव्य केले, असे मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केले आहे.
24 Feb 2025 02:10 PM (IST)
डिंग्रजवाडी (ता.शिरुर) येथील एका शेतात शौचास जाणाऱ्या उसतोड कामगार महिलेला पाईपने बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे संदीप पोपट गव्हाणे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील संदीप गव्हाणे यांच्या घराच्या शेजारी दहा दिवसांपासून काही उसतोड कामगार राहत असून, सकाळच्या सुमारास उषाबाई गायकवाड या गव्हाणे यांच्या शेताकडे शौचास जात असताना संदीप गव्हाणे या इसमाने शेताकडे येत ‘तुम्ही शेतात शौचास का येता? तुमच्याकडे बघतोच…’ असे म्हणून महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली.
24 Feb 2025 01:49 PM (IST)
प्रयागराजमध्ये मागील महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरु आहे. यामध्ये अनेक राजकीय नेत्यांनी अमृतस्नान केले आहे. आता भाजप नेत्या आणि आमदार पंकजा मुंडे यांनी महाकुंभमेळ्यामध्ये सामील होत अमृतस्नान केले आहे. यावेळी त्यांनी उपासना देखील केली आहे.
24 Feb 2025 01:17 PM (IST)
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेती माफीयांनी थैमान घातला असून अनेक अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहेत त्यासाठी येणाऱ्या काळात सर्व सामान्य नागरिकांना रैती उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कडक उपाययोजना करण्यात येणार असून जेणेकरून अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची जाणीव ठेवून प्रशासन काम करणार आहे. रैती धोरणामध्ये अनेक बदल देखील करण्यात येणार आहेत अधिकाऱ्यांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता न घाबरता महसुलाचे काम करावे, त्यासाठी प्रशासनामार्फत शस्त्रधारी कर्मचारी देखील महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
24 Feb 2025 12:57 PM (IST)
"नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना ठाकरे गटाबद्दल वादग्रस्त विधान केल्याने वादाला तोंड फुटले आहे. बुलढाण्याचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की, नीलम गोऱ्हे यांचा एकनाथ शिंदे कडून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्ननीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे, मातोश्री सह तमाम शिवसैनिकांची माफी मागावी. अन्यथा त्यांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही," असा इशारा जालिंधर बुधवत यांनी दिला आहे.
24 Feb 2025 12:37 PM (IST)
लवकरच होळीचा सण साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारने भेटवस्तू देण्याचा निर्णय घेतला आहे. लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साडी देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारे अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार करण्यात आले आहेत.
24 Feb 2025 12:21 PM (IST)
उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. मागील महिन्यापासून हा कुंभमेळा सुरु असून आता शेवटचे काही दिवस बाकी आहेत. दरम्यान, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा देखील प्रयागराजमध्ये गेला आहे. अक्षयने महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केले आहे.
24 Feb 2025 12:08 PM (IST)
थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी नागरिकांना वेळोवेळी आवाहन करण्यात आले. सवलती तसेच नोटिसा बजावून देखील दुर्लक्ष केले जात असल्याने आता 50 हजार थकीत मालमत्ता धारकांच्या घराला महापालिकेचे नाव लावण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान मनपाच्या आयुक्त अमिता दगडे पाटील कर वसुली करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहे. कोट्यवधींची थकबाकी असल्याने धुळे महापालिकेसमोर मोठे आव्हान आहे. मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून तीव्र कारवाई केली जाणार आहे. यासाठी वर्षानुवर्ष थकीत कर न भरणारे थकबाकीदारांची नावे दैनिकात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
24 Feb 2025 11:54 AM (IST)
नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रामध्ये कॉंग्रेसची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. सपकाळ हे लवकरच कॉंग्रेसच्या नेत्यांची आणि पदाधिकऱ्यांची बैठक घेणार आहेत. यामध्ये ते पक्षाचा संघटनात्मक आढावा घेणार आहेत. आज आणि उद्या जिल्हाध्यक्ष तसेच प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक असणार आहे. आज राज्यातील सर्व जिल्ह्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहणार उपस्थित, तर उद्या 25 फेब्रुवारीला प्रदेश कमिटीच्या प्रतिनिधीची बैठक पार पडणार आहे.
24 Feb 2025 10:45 AM (IST)
जळगावच्या शाहूनगरात एमडी ड्रग्सची एका तरुणांकडून विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काल रात्री छापा टाकून कारवाई केली असून एम डी ड्रग्स विक्री करणाऱ्या सरफराज जावेद भिस्ती या तरुणाला अटक केली आहे. अटकेतील सरफराज जावेद भिस्ती याच्याकडून ५ लाख ३४ हजार एवढे किमतीचे ५३ ग्रॅम ४० मिलिग्राम एवढे एमडी ड्रग्स हस्तगत केले आहे.
24 Feb 2025 10:32 AM (IST)
संतोष देशमुख हत्याप्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही, असा निर्धार आमदार सुरेश धस यांनी केला आहे. धाराशिवमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये त्यांनी सत्कार नाकारला. भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भाजप आमदार सुरेश धस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र, त्यांनी सत्कार नाकारला आहे. जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात न्याय मिळत नाही, तोपर्यंत आपण सत्कार स्वीकारणार नाही, असे त्यांनी म्हटले.
24 Feb 2025 10:31 AM (IST)
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. थंडीचे दिवस संपून आता उन्हाळा सुरु होत आहे. त्यातच उत्तर भारतासह देशभरात उष्णता सतत वाढत आहे. येत्या काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मंगळवारी (दि.25) एक नवीन पश्चिमी विक्षोभ येणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये 25-28 फेब्रुवारी, हिमाचल प्रदेशात 26-28 फेब्रुवारी, उत्तराखंडमध्ये 27 आणि 28 फेब्रुवारी या दिवसांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
24 Feb 2025 10:30 AM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. याच योजनेमुळे भाजप-महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला योजनेच्या रकमेत वाढ होण्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांपासून महागाई भत्ता न मिळाल्याने संतप्त आहे. सरकारी कर्मचारी काम बंद आंदोलनाची तयारी करत आहेत.






