Varsha Gaikwad News: सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला चार महिन्यांच्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्यभरातील सर्व पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. अशातच मुंबई काँग्रेसच्या गोटात मात्र वेगळ्याच घडामोडी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र यावर देखील तर्कवितर्क काढले जात आहेत. त्याचवेळी काँग्रेसमध्ये अंतर्गतवाद असल्याने ते आगामी मुंबई महापालिका निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढणार असा प्रश्न होता.
खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपद आहे. पण काँग्रेसमधील नेत्यांनीच त्यांच्याविरोधातपक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस जिंकू शकत असलेल्या जागा गायकवाड यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या, तसेच त्यांना हटवून त्यांच्या जागी नवे नेतृ्त्त्व द्यावे, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे. पण मल्लिकार्जून खर्गे यांनी मात्र खासदार राहूल गांधी यांच्याशी चर्चा करून वर्षा गायकवाड याच महापालिका निवडणुकांचे नेतृत्त्व करणार असल्याचे निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पालिका निवडणुकीपर्यंत शांत करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने दिल्लीतील पक्ष नेतृत्त्वाशी चर्चा करून मुंबई महापालिका निवडणुकांची रणनीती ठरवली आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत वर्षा गायकवाड यांच्या विरोधात असलेल्या कोणत्याही तक्रारींवर चर्चा झाली नसल्याचे सांगितले जात आहे. यासोबतच आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुथ पातळीवरील बांधणी आणि कार्यकर्त्यांवर देण्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबतही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.