मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केला आहे. त्यानंतर महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) हे बेळगावला (Belgaon) जाऊन तिथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) नेत्यांशी चर्चा करणार होते. पण, त्यापूर्वीच बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इशारा दिला आहे.
मंत्री पाटील आणि देसाई हे ६ डिसेंबरला बेळगावला जाणार होते. पण, आज (५ डिसेंबर) बसवराज बोम्मई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाराजी व्यक्त केली. तसेच, बेळगावात आल्यास कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत बोम्मई यांनी दिले.
बोम्मई म्हणाले, कर्नाटकच्या मुख्यमंत्री सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहूनही मंत्र्यांनी बेळगावला भेट देणे योग्य नाही. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार, असल्याचे म्हटले आहे. त्यांना देशात मुक्तपणे फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. पण, ही योग्य वेळ नाही. महसूल आणि पोलीस प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती बोम्मई यांनी दिली.
बेळगावचा दौरा मंत्री पाटील आणि मंत्री देसाईंनी रद्द केल्याची चर्चा होती. त्यावर शंभूराज देसाई यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेळगावात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी आम्ही आमचा ६ तारखेचा दौरा निश्चित केलेला आहे. आम्ही येणार आहोत, असे कर्नाटक सरकारला अधिकृतरित्या कळवले आहे. परंतु, दौऱ्याबाबत विस्तृत माहिती दिलेली नाही. सध्या तरी हा दौरा अधिकृतरित्या रद्द केला नाही. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांशी चर्चा करून आम्ही दोघेही त्यांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेणार आहोत, असे शंभूराज देसाईंनी सांगितले.