
फोटो सौजन्य - Social Media
डहाणू तालुक्यात अवैध खासगी सावकारीचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असून, त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक, लहान व्यावसायिक, शेतकरी, मजूर तसेच तरुण वर्गाला बसत आहे. ‘हातोहात पैसे’ देण्याचे आमिष दाखवून मासिक १० ते २० टक्क्यांपर्यंत अवाजवी व्याज आकारले जात असल्याने अनेक कर्जदार आर्थिक कोंडीत अडकले आहेत. वेळेवर रक्कम न भरल्यास मानसिक छळ, धमक्या, बदनामी आणि जबरदस्तीची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या जाचाला कंटाळून काही कर्जदारांनी टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटनांनी या समस्येचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे.
अधिकृत बँकांकडून कर्ज मिळवताना लागणारी कागदपत्रे, हमीदार आणि कडक नियमांमुळे अनेक गरजूंना वेळेवर कर्ज मिळत नाही. त्यामुळे तातडीच्या पैशांसाठी नागरिक बिनकागदी कर्ज देणाऱ्या खासगी सावकारांकडे वळतात. सुरुवातीला कोणतीही अट नसल्याचे भासवले जाते; मात्र काही दिवसांतच विलंब शुल्क, दंड, ‘फॉलोअप फी’ अशा नावाखाली अतिरिक्त रक्कम आकारून कर्जदारांची आर्थिक पिळवणूक केली जाते. काही सावकार कर्ज देतानाच कोरे धनादेश किंवा सही केलेले कागदपत्रे घेऊन ठेवतात आणि नंतर मनमानी रक्कम भरून चेक बाऊन्सची धमकी देतात, असा आरोप नागरिक करत आहेत.
डहाणू व परिसरात वसुलीसाठी घरासमोर आरडाओरड करणे, नातेवाईकांना फोन करून धमक्या देणे, कामाच्या ठिकाणी जाऊन अपमान करणे, भाड्याच्या दलालांमार्फत दबाव आणणे अशा बेकायदेशीर पद्धती वापरल्या जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. अलीकडेच डहाणूतील एका लॉजमध्ये खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर अवैध सावकारी रोखण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
परवानाधारक सावकारांसाठी शासनाने वार्षिक व्याजदर निश्चित केलेला असतानाही अनेक ठिकाणी त्याचे उल्लंघन होत आहे. वार्षिक व्याजाऐवजी मासिक व्याज आकारून नियमबाह्य वसुली केली जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. परवाना नसलेल्या सावकारांवर महाराष्ट्र मनी लेंडिंग (रेग्युलेशन) कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, त्यांची यादी तयार करून छापे टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच त्रस्त कर्जदारांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन, मोफत कायदेशीर मदत केंद्र आणि समुपदेशन सुविधा सुरू करण्याचीही मागणी करण्यात येत आहे.
सावकारांविरोधात तक्रार करण्यास अनेकजण घाबरतात. व्यवहार बिनकागदी असल्याने पुरावे सादर करताना अडचणी येतात, तर काही सावकारांना स्थानिक राजकीय पाठबळ असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. कर्जाच्या नावाखाली घर, दागिने, वाहन किंवा जमिनीवर ताबा मिळवण्याचे प्रकारही वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, डहाणू अनिल रा. पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, तक्रारदारांनी उपलब्ध पुराव्यानिशी कार्यालयात तक्रार दाखल करावी. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने संबंधितांवर नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी आणि कठोर शिक्षाच अवैध सावकारीचे वाढते जाळे रोखू शकते, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.