फोटो सौजन्य - Social Media
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांतर्गत मातृआरोग्य, बालआरोग्य, कुटुंबनियोजन यांसह तब्बल ३० महत्त्वाच्या आरोग्य निर्देशकांवर आधारित तपासणी आरोग्य विभागाच्या पथकाने ऑक्टोबर महिन्यात केली होती. या कसून पाहणीदरम्यान वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयात पुरविण्यात येणाऱ्या सेवांना ‘सर्वोत्कृष्ट’ असा शेरा देण्यात आला. सुरक्षित प्रसूतीसाठी वात्सल्यपूर्ण सेवा, अद्ययावत डायलिसीस सुविधा, कुपोषित बालकांसाठी पुनर्वसन केंद्र (एनआरसी) यासह गंभीर रुग्णांसाठी सुसज्ज आयसीयू, अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहे, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तपेढी, सोनोग्राफी व सीटी स्कॅन यांसारख्या जीवनदायिनी सुविधा येथे उपलब्ध असल्याचे पथकाने नमूद केले.
पूर्वी आरोग्य सेवा निर्देशकांच्या अंमलबजावणीत वाशिम जिल्हा राज्यातील ‘टॉप फाइव्ह’मध्येही नव्हता. मात्र, सुमारे अडीच वर्षांपूर्वी डॉ. अनिल कावरखे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर आरोग्य व्यवस्थेत सकारात्मक बदलांची नवी पहाट उगवली. कर्मचाऱ्यांशी आपुलकीची वागणूक, संघभावनेतून काम करण्यावर दिलेला भर आणि रुग्णांशी सौजन्यपूर्ण संवाद यामुळे केवळ भौतिक व मूलभूत सुविधा सुधारल्या नाहीत, तर शासकीय आरोग्य सेवांवरील नागरिकांचा विश्वासही पुन्हा दृढ झाला.
या यशामागे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरले आहे. मात्र, या यशाचे खरे श्रेय वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी बांधव यांच्या एकत्रित, प्रामाणिक आणि समर्पित प्रयत्नांना जाते, असे डॉ. कावरखे यांनी नमूद केले. भविष्यातही अधिक प्रभावी, दर्जेदार आणि संवेदनशील आरोग्य सेवा पुरविणे हेच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. माणुसकीचा स्पर्श, शिस्तबद्ध व्यवस्थापन आणि पारदर्शक कार्यपद्धतीमुळे वाशिम जिल्ह्याचे नाव आज महाराष्ट्राच्या आरोग्य नकाशावर अभिमानाने झळकत आहे.






