मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उद्या सातारा बंदचे आवाहन
सातारा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राजधानी मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी (दि. ७) सातारा शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये शहरातील व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, सामाजिक संघटना तसेच मराठा समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
बंदच्या पार्श्वभूमीवर राजधानी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पोवईनाका येथील शिवतीर्थावर एकत्र आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्याच्या उद्देशाने सातारा बंदचे आयोजन करण्यात आल्याचे मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला साताऱ्यातून पाठिंबा देण्यासाठी विविध घटकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, पोवईनाका येथे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या बंदला शहरातील व्यापारी व व्यावसायिकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.






