
अर्पणद्वारे मुंबईत 'बाल सुरक्षा सप्ताह'ची सुरुवात, बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी घेतला पुढाकार
मुंबई : बाल लैंगिक शोषणाची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी समर्पित स्वयंसेवी संस्था अर्पणने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईत बाल सुरक्षा सप्ताह २०२५ ची सुरुवात केली. यंदा बाल सुरक्षा सप्ताहाच्या सातव्या वर्षात अर्पणने बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी “जर तुम्ही कोणत्याही मुलाचे लैंगिक शोषण कराल, तर तुम्हाला पॉक्सो पकडेल” या धाडसी विषयावर लक्ष केंद्रीत केले आहे. पॉक्सोपकडलेगा हा या अभियानाचा प्रमुख केंद्रबिंदू असून, हा केवळ इशारा नसून शोषणकर्त्यांना कायद्याचे भान देणारा ठोस संदेश आहे. हे अभियान पॉक्सो कायद्याची कडक अंमलबजावणी आणि उल्लंघनाचे गंभीर परिणाम अधोरेखित करते. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री विद्या बालन यांनी या अभियानाला पाठिंबा दर्शवला असून त्या यंदाच्या बाल सुरक्षा सप्ताहाचे नेतृत्व करत आहेत.
मुलांची सुरक्षा आणि पॉक्सो कायद्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी लाइन २अ (२A) आणि ७ च्या मेट्रो ट्रेनच्या सर्व कोचांनापॉक्सोपकडलेगा या प्रभावी संदेशांनी सजवण्यात आले आहे. या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
मेट्रो ट्रेनच्या अनावरणानंतर, या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांनी, अर्पणच्या कर्मचार्यांसोबत या ट्रेनमधून गुंदवली स्टेशन ते आरे स्टेशन असा प्रवास करत, एका अनोख्या पद्धतीने, बाल सुरक्षेचा संदेश दिला. या मेट्रो ट्रेनच्या सर्व सहा डब्यांमध्ये विद्या बालन, अनुप सोनी, मानव गोहली आणि श्वेता कवात्रा यांची बाल सुरक्षेचा प्रभावी संदेश देणारी पोस्टर्स लावण्यात आली असून, हे अभियान लहान मुलांचे शोषण करणार्या व्यक्तींना, बाल लैंगिक शोषण हा एक शिक्षापात्र गुन्हा असल्याचा थेट आणि स्पष्ट इशारा देणार आहे. तसेच पॉक्सो कायद्यामुळे भारतातील प्रत्येक मूल सुरक्षित आहे, याकडे या मार्गांवर नियमितपणे प्रवास करणार्या हजारो प्रवाशांचे लक्ष वेधले जाणार आहे.
यंदाच्या बाल सुरक्षा सप्ताहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या संयुक्त भागीदारीचे प्रतिक म्हणून गुंदवली, दहिसर आणि अंधेरी पश्चिम या मुंबईच्या तीन मेट्रो स्टेशन्समध्ये दिनांक १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत सेल्फी घेण्यासाठी बूथ उभारले जाणार आहेत. या स्टेशन परिसरातील हजारो प्रवासी या सेल्फी बूथजवळ पॉक्सोपकडलेगा या संदेशासोबत फोटो काढू शकतात, त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करू शकतात आणि त्यात अर्पण संस्थेला (@arpan_csa) टॅग करून, मुलांची सुरक्षा या आपल्या समान ध्येयासाठी एकजुटीने उभे राहू शकतात.
अर्पणच्या बाल सुरक्षा सप्ताह अभियानाला पाठवलेल्या सदिच्छा संदेशात, डॉ. संजय मुखर्जी, आयएएस, मेट्रोपॉलिटन कमिशनर, एमएमआरडीए म्हणाले की, “अर्पणच्या बाल सुरक्षा अभियानामध्ये पुन्हा एकदा सहभागी होताना, एमएमआरडीएला आनंद होत आहे. एमएमआरवर मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे आणि सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवणं, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यावर्षी पॉक्सोपकडलेगा अभियानातून आम्ही बाल लैंगिक शोषण हा एक गंभीर आणि शिक्षापात्र गुन्हा असल्याचा संदेश देत आहोत आणि प्रत्येक मुलासाठी एक सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्व नागरिकांनी आम्हाला मदत करावी म्हणून त्यांना प्रोत्साहन देत आहोत.”
अभिनेत्री, उद्योजिका आणि विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यात आघाडीवर असलेल्या श्वेता कवात्रा यांनी हे अभियान प्रत्येक मुलाला सुरक्षिततेचा आणि आत्मसन्मानाचा हक्क मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला. या अभियानाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी माझ्या आयुष्यात अनेक भूमिका केल्या आहेत. पण आपल्या मुलांचं संरक्षण करणाऱ्या एका आईपेक्षा सामर्थ्यवान भूमिका दुसरी असूच शकत नाही. प्रत्येक मुलाला सुरक्षित राहण्याचा अधिकार आहे आणि मी या अधिकाराचं रक्षण करण्यासाठी ठामपणे उभी आहे.”
चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण आणि पठडीबाहेरच्या भूमिका करण्यासाठी ओळखले जाणारे अभिनेता मानव गोहील आणि श्वेता कवात्रा हेसुद्धा इतर मान्यवरांसोबत या प्रवासात सहभागी होऊन, या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार झाले आणि त्यांनी या अभियानाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याची भावना व्यक्त केली. या अभियानाविषयी बोलताना ते म्हणाले की, “अर्पणच्या या जनजागृतीपर अभियानामध्ये सहभागी होणं, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या अभियानामध्ये सहभागी होऊन मी लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या व्यक्तींना इशारा देतो की, जर त्यांनी कोणत्याही मुलाला अयोग्यपणे स्पर्श केला, तर त्यांना पॉक्सो कायदा पकडेल. एक वडील या नात्याने मी सर्व पालकांना आणि काळजीवाहकांना विनंती करतो की, त्यांनीसुद्धा आपल्या मुलांच्या मागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्यांच्या सुरक्षेसाठी हे धाडसी पाऊल उचललं पाहिजे आणि बाल लैंगिक शोषणाचा विरोध करून अशा घटनांविरुद्ध एकजुटीने लढलं पाहिजे. चला तर आपल्या मुलांच्या सुरक्षित बालपणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी सगळे जण एकत्र येऊया.”
अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया याप्रसंगी बोलताना म्हणाल्या की, “बाल सुरक्षा सप्ताह ही प्रत्येक मुलाला लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही समाजाला घातलेली साद आहे. आम्ही एमएमआरडीए आणि एमएमएमओसीएलचे मनापासून अभार मानतो की, त्यांनी या अभियानामध्ये आम्हाला साथ देऊन, पॉक्सोपकडलेंगा हा अर्पणच्या अभियानाचा संदेश, समस्त मुंबईकरांचा श्वास असलेल्या मुंबई मेट्रोमध्ये प्रदर्शित करण्याची संधी दिली. आता यापुढे या ट्रेनमधून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी मुलांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेईल आणि ‘बाल लैंगिक शोषणमुक्त जग’ हे आमचं ध्येय साकारण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा मला विश्वास आहे. या उपक्रमामुळे बाल सुरक्षेचा संदेश समाजातील सर्व स्तरांवर आणि प्रत्येक नागरिकाच्या मनावर बिंबवण्यास मदत झाली आहे. जेव्हा शासकीय अधिकारी, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सामाजिक संस्था एकत्रितपणे काम करतात, तेव्हा काय घडू शकतं, याचं ही भागीदारी म्हणजे एक मूर्तीमंत उदाहरण आहे.