हवामान बदलाचा विमान सेवेला फटका; फेब्रुवारीत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21 टक्क्यांवर
मुंबई : देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे बदलत्या हवामान बदलाचा विमान सेवेला फटका बसत आहे. फेब्रुवारी महिन्यात देशांतर्गत विमान रद्द होण्याचे प्रमाण 21.6 टक्के होते. तर तांत्रिक कारणांमुळे तब्बल 44.4 टक्के विमान रद्द करण्याची नामुष्की विविध विमान कंपन्यांवर आली.
कोरोनानंतर विमान प्रवाशांच्या संख्येत प्रंचड वाढ झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात तब्बल 140.44 लाख प्रवाशांनी देशांतर्गत प्रवास केला. गेल्या वर्षी फेब्रुवारीत 12648 लाख प्रवाशांनी ये-जा केली होती. म्हणजेच यंदा प्रवासी संख्येत 14 लाखांची वाढ झाली आहे. परंतु, विमान रद्द होण्याचे प्रमाण देखील वाढते आहे.
फेब्रुवारी महिना तसा गुलाबी थंडीचा म्हणून ओखळला जातो. परंतु उत्तर आणि पश्चिम भारतातील काही भागांमध्ये कमाल तापमान सामान्यपेक्षा ५ ते ११ अंश सेल्सिअसने जास्त होते. त्यामुळे उन्हाळा सुरु होण्याच्या आधीच देशातील अनेक राज्यात उष्णता वाढली होती.
फेब्रुवारी महिन्याच्या मध्यातच काही राज्यात 40 अंश सेल्सिअसपर्यंत पारा चढला होता. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हवामानाचा भारतीय हवाई वाहतूकीवर परिणाम झाला. वाढत्या उन्हाचा परिणाम हवाई सेवेवर झाला. यामुळे प्रवाशांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.
फेब्रुवारी सर्वाधिक तापमान असलेला महिना
देशभरात फेब्रुवारी महिना सर्वाधिक तापमान असलेला महिना ठरला. 1901 पासून देशात तापमान नोंदी सुरू करण्यात आल्या. 1901 पासून यंदाचा 2025 चा फेब्रुवारी महिना सर्वात उष्ण महिना ठरला आहे. फेब्रुवारी महिन्यातील तापमान उष्ण असे नोंदवण्यात आले. यावर्षी फेब्रुवारी महिना मध्य भारतातील आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी होता. यानुसार मागील 125 वर्षांतील सर्वात उष्ण फेब्रुवारी महिन्याचा विक्रम केला आहे.