स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे 'Operation Sindoor'वर भाष्य; म्हणाले, "यामुळे जगालादेखील..."
मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला आहे. आज आपला भारत देश ७९ व्या स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर, राज्याचा विकास याबाबत भाष्य केले आहे.
महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भारताच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. विकसित महाराष्ट्र, विकसित भारताच्या स्वप्नात विशेष योगदान देत आहे. देशाची विकास गाथा आता थांबणार नाही. पंतप्रधानांनी दिलेला आत्मनिर्भर भारताचा संकल्प खूप महत्वाचा आहे.”
पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर’च्या निमित्ताने भारतीय सेनेने भारताची शक्ती काय आहे, हे संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारताच्या सेनेने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आतंकवाद्यांचे तळ उद्वस्त केले. त्यातून भारतावरील होणारे हल्ले परतवून लावले. यामुळे जगालादेखील नवीन भारत काय आहे, हे या ऑपरेशन सिंदूरमुळे समजले आहे. म्हणून ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या-ज्या सेनेच्या अधिकाऱ्यांनी आणि सैनिकांनी सहभाग घेतला त्यांचंही अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो.”
भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम येथे, भारताच्या विकासयात्रेत महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे माझे संबोधन…
(15-8-2025📍मंत्रालय, मुंबई) #Maharashtra #IndependenceDay #ViksitBharat pic.twitter.com/hYjI3mlzE0
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 15, 2025
“आज भारताची विकासगाथा कोणीही थांबवू शकत नाही. विविध क्षेत्रांमध्ये भारत प्रगती करतो आहे. अंतराळ क्षेत्रातही भारताने ठोस पाऊल ठेवले आहे. भारताला आत्मनिर्भर करण्याकरिता जगातले जे उत्पादन आहे, ज्या व्यवस्था आहेत, त्या सगळ्या भारतामध्ये गुणवत्तापूर्ण तयार कराव्या लागतील. स्टार्टअप्स, टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तेवढ्याच समर्थपणे उभ्या कराव्या लागतील. त्या दिशेने भारताची वाटचाल सुरु आहे. प्रधानमंत्र्यांनी स्वदेशीचे आवाहन केले आहे. जिथे जिथे शक्य असेल, त्या त्या ठिकाणी स्वदेशीचा वापर करून आत्मनिर्भर भारताला बळकटी देण्याचे कार्य करायचे आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेती व ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची भरारी
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकरता मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत जगातला सगळ्यात मोठा डिस्ट्रीब्यूटेड सोलरचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. हा प्रकल्प 2026 च्या डिसेंबरमध्ये पूर्ण झाल्यानंतर निश्चितपणे शेतकऱ्यांना 12 तास दिवसाची वीज मिळेल. त्यावेळी 100 टक्के हरित वीज देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.