मोठी बातमी! 'लाडकी बहीण योजने'बाबत मुख्यमंत्र्यांचे नवीन आश्वासन; म्हणाले, ''टप्प्याटप्प्याने तीन हजार...''
महायुती सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेनुसार दर महिन्याला महिलांच्या खात्यात १,५०० रूपये जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान या योजनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील सर्व महिलांना एक नवीन आश्वासन दिले आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे टप्प्याटप्याने वाढवून तीन हजारांपर्यंत नेणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिली आहे. मुख्यमंत्री साताऱ्यातील महिला सशक्तीकरण अभिनयनांतर्गत एका कार्यक्रमात बोलत होते.
राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसतसे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे दीड हजारांवरून तीन हजार केले जातील अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सध्या माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे सरकार सांगत आहे. ३५ ते ४० हजार कोटींची तरतूद या योजनेसाठी करण्यात आली आहे.
राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा १ हजार ५०० रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही लाडक्या बहीणींना दिली. https://t.co/9THMN6JD5F pic.twitter.com/0c2bEcRmAZ
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 18, 2024
महिला जोवर सशक्त होत नाहीत, तोवर अर्थव्यवस्था बळकट होत नाही. पैसे कुठे खर्च करायचे हे महिलांना चांगले कळते.या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर महिला लहान मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. ती कधीही बंद होणार नाही. शासन हे बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
माझी ताई शेतात कष्ट करते याची आम्हाला जाणीव आहे. या योजनेच्या अंतर्गत जवळपास १ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. शासन हे समाजातील सर्व घटकांसाठी प्रयत्नशील आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मान देखील वाढवायचा आहे. माझी लाडकी बहीण योजना ही महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या कर्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री आदिती तटकरे देखील उपस्थित होत्या.