Uddhav Thackeray was sweating after a closed-door discussion with Prime Minister Narendra Modi; Secret incident told by Chief Minister Eknath Shinde
CM Eknath Shinde in Kolhapur : उद्धव ठाकरे यांनी एकदा नाही तर दोन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला फसवलं, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमधील महाअधिवेशनात सांगितले. शिवसेना शिंदे गटाचे महाअधिवेशन कोल्हापूर येथे संपन्न होत आहे.
उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका
दोन दिवसांच्या या अधिवेशनात आज एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. “तुम्ही २०१९ साली भाजपासह निवडणूक लढविली होती. त्यांच्याबरोबर सरकार स्थापन करायला पाहिजे होते. पण, तुम्ही सत्तेच्या खुर्चीसाठी लग्न ऐकाबरोबर, संसार दुसऱ्याबरोबर आणि हनिमून तिसऱ्याबरोबर केलात. तुम्ही जनतेलाही फसवलं, शिवसैनिकांनाही फसवलं, पंतप्रधान मोदी आणि भाजपालाही फसवले.
एकीकडे मोदींचा फोटो लावून मतं मिळवली
निवडणुकीत एकीकडे बाळासाहेब, एकीकडे मोदींचा फोटो लावून मतं मिळवली. पण सत्तेसाठी सगळं गमवलं. मग सत्तेसाठी बेईमानी कुणी केली? ही बेईमानी पहिल्यांदा केली होती. दुसऱ्यांदा कधी केली ते मी आज सांगतो”, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुसरा एक प्रसंग सांगितला.
मोदी-ठाकरे यांच्यात बंद दाराआड चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण दिल्लीला गेले होते. ठाकरे कुटुंबातील गैरव्यवहार बाहेर येऊ लागल्यानंतर ही भेट झाली होती. तेव्हा बैठक संपल्यानंतर अजित पवार आणि अशोक चव्हाण यांना बाहेर थांबवून उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. बाहेर आल्यानंतर तुम्हाला घाम आला, तुम्ही दोन ग्लास पाणी प्यायलात, हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितले.”
दोन वेळा ठाकरेंनी मोदी-भाजपाला फसवलं
“मी कधी खोटं बोलत नाही. दिल्लीत तुम्ही (उद्धव ठाकरे) मोदींना वचन देऊन आला होतात. आपण एकत्र येऊन पुन्हा युती करुया, असे सांगितले होते. पण, तरीही तुम्ही युती केली नाही. एकदा नाही, तर दोनदा तुम्ही भाजपला आणि पंतप्रधान मोदी यांना फसवले. मग तुम्ही आमच्यावर कसे आरोप करू शकता. आम्हाला गद्दार, बेईमान बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. उलट आम्ही शिवसेना आणि धनुष्य-बाण वाचवला.”
शिवसेना कुणाची हे सांगायची गरजच नाही
आज आपण शिवसेना ताकदीने उभी करीत आहोत. शिवसैनिकांमध्ये उत्साह तळपतो आहे. आज मला समाधान आहे की, शिवसेना पक्ष पुढे जात आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे आहे, ही जमेची बाजू आहे. सत्यमेव जयते हे कायमच मी सांगत आलो. त्यामुळेच आपल्याला शिवसेना मिळाली आणि धनुष्यबाणही मिळाला. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याकडे तसाच महाराष्ट्रातील जनतेचा आशीर्वादही आपल्या पाठिशी आहे. आज जी काही गर्दी झाली आहे त्यामुळे शिवसेना कुणाची आहे, हे सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाही.