महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात तरुणांसाठी काय काय?
विधानसभा निवडणुकीसाठी अवघे १० दिवस उरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर मतदारांना खूश करण्यासाठी राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. आजच भाजपकडून संकल्पपत्र जाहीर करण्यात आलं. त्यानंतर लगेचच महाविकास आघाडीकडूनही जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय करणार? .याची माहितीही यावेळी देण्यात आली. महिला, शेतकरी, तरुण व शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, जनतेच्या हितासाठी, शहर विकासाबाबत अनेक आश्वासने महाविकास आघाडीने दिली आहेत.
सर्व सरकारी व खासगी शाळा-महाविद्यालयांतील रखडलेली शिक्षक भरती सुरू करणार
‘बार्टी’, ‘महाज्योती’ आणि ‘सारथी मार्फत देण्यात येणारा शिष्यवृत्तीचा निधी वाढविणार
यूपीएससी प्रमाणेच ‘एमपीएससी’चे वेळापत्रक निश्चित करणार, परीक्षांचा निकाल ४५ दिवसांत लावणार प्रवेश परीक्षा फी माफ करणार
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ३ ग्रंथालये आणि प्रत्येक तालुक्यात एक अशाप्रकारे ३५८ वातानुकूलित अभ्यासिकांची निर्मिती करणार
कोकणात ‘फिशिंग अँड मरीन सायन्स विद्यापीठ स्थापन करणार
मोफत शिक्षणाची मर्यादा वाढविणार
शाळा, महाविद्यालये, प्रायव्हेट कोचिंग क्लासेसची फी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करणार
सरकारी शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षणावरील तरतूद वाढविणार
डिजिटल क्लासरूम्सची व्यवस्था करणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्स, सायकल आणि वाहनसेवा मोफत देणार
जिल्हा परिषद शाळा बंदीचा निर्णय रद्द करणार, पटसंख्येअभावी शाळा बंद करणार नाही, तसेच आरटीईच्या कक्षेबाहेर एकही शाळा न राहण्याची दक्षता घेणार
पालकांचे प्रबोधन व मुलांच्या शिक्षणासाठीचे धोरण आखणार
प्रत्येक जिल्ह्यात शासकीय अभियांत्रिकी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार
उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शैक्षणिक कर्ज देणार
ओबीसींना १० वीनंतर मिळणारी शिष्यवृत्ती तातडीने मिळण्याची व्यवस्था करणार, तक्रार मांडण्याची व्यवस्था निर्माण करून २१ दिवसांत निवारण करणार
१० वीनंतरच्या शिक्षणासाठी ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात ३ वसतिगृहे निर्माण करणार
राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीची संख्या वाढविणार शिष्यवृत्तीसाठीच्या अटी कमी करणार
दहावी-बारावी अनुत्तीणांसाठी आयटीआय दोन शिफ्टमध्ये चालविणार
रोजगारक्षमता आणि कौशल्य निर्मितीसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी आणि आयआयटी, मुंबई या संस्था संयुक्तपणे काम करणार
रॅगिंग प्रतिबंधक कायद्याचे पुनर्विलोकन करणार, २०१२ मध्ये स्वीकारलेल्या छेडछाडमुक्त महाराष्ट्र धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करणार
पुण्यात नियोजन व वास्तुविशारद प्रशिक्षण महाविद्यालयाची (कॉलेज ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर) स्थापना करणार
कुशल अध्यापक निर्मितीसाठी ‘अध्यापक प्रशिक्षण विद्यापीठ विकसित करणार