सुविधा देणारी दुकानांना कायद्याने वेळेचे निर्बंध नाही
मुंबई : सध्या 24 तास सुविधा देणाऱ्या दुकानांवर कायद्याने वेळेचे निर्बंध नाहीत. त्यामुळे, ती 24 तास सुरू राहू शकतात. शिवाय, या दुकानांमुळे ग्राहकांसह अर्थव्यवस्थेला फायदा होतो, असे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने नोंदवले. तसेच, रात्री 11 वाजेपर्यंत दुकाने बंद करण्याची सक्ती न करण्याचे आदेशही न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले. पुण्यातील हडपसर भागात ‘द न्यू शॉप’ चालवणाऱ्या ‘ॲक्सिलरेट प्रॉडक्टएक्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड’ने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
24 तास सुविधा देणारी दुकाने सुरू ठेवण्याची संकल्पना जगभरात आहे. या अशा दुकानांमुळे ग्राहक कोणत्याही क्षणी सहज खरेदी करू शकतात. नियमित वेळांमध्ये काम न करणाऱ्यांसाठी ही दुकाने खूपच महत्त्वाची ठरतात. या दुकानांमुळे ग्राहकांचा खरेदीकडे कल वाढून अतिरिक्तm रोजगाराच्या संधी निर्माण होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असेही न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने आदेशात नमूद केले. ही बाब आपल्या देशातील बेरोजगारीच्या समस्येसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचेही न्यायालयाने प्रामुख्याने अधोरेखित केले आहे.
वेळेच्या निर्बंधांमुळे गैरसमज; पोलिसांचा न्यायालयात दावा
24 तास सुविधा देणारी दुकाने रात्रभर सुरू ठेवता येणार नाहीत, असे कोणत्याही कायद्यात म्हटलेले नाही. असे असताना स्थानिक पोलिसांकडून बेकायदेशीररीत्या आणि मनमानी पद्धतीने कंपनीला रात्री 11 वाजेपर्यंत दुकान बंद करण्यास भाग पाडले जाते, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. तर वेळेच्या निर्बंधामुळे ‘गैरसमज’ निर्माण झाला होता, असा दावा पोलिसांनी केला होता.
‘या’ आस्थापनांचा अपवाद
हुक्का पार्लर, परमिट रूम, डान्स बार आणि/ किया मद्यविक्री उपलब्ध करणाऱ्या रेस्टॉरंट्ससारख्या आस्थापनांचा अपवाद वगळता 24 तास सेवा देणाऱ्या दुकानांवर आठवड्याचे सातही दिवस सुरू ठेवण्यावर बंधने नसल्याचे स्पष्ट केले. सिनेमागृह 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिल्याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.