सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. सी. पी. राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून मध्यरात्रीनंतर १ वाजता यासंदर्भातील पत्रक जारी करण्यात आले. यात जवळपास 10 राज्यांमधील राज्यपालांच्या बदल्या तसेच फेरनियुक्त्या करण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्राला मिळाले नवीन राज्यपाल
रमेश बैस हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. त्यांच्या जागी सी. पी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असतील. सी.पी. राधाकृष्णन हे सध्या झारखंडचे राज्यपाल आहेत. महाराष्ट्रात बदली झाल्यानंतर झारखंडमध्ये संतोषकुमार गंगवार राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
कोण आहेत सी.पी, राधाकृष्णन
सी.पी राधाकृष्णन (वय ६७) हे मूळ तामिळनाडूचे आहेत. तामीळनाडूच्या तिरुपूरमध्ये 4 मे 1957 रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या 16 व्या वर्षी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले. सी.पी राधाकृष्णन आतापर्यंत दोन वेळ कोइंबतूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2004 ते 2007 या काळात त्यांनी भाजपचे तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले आहे.
नवीन नियुक्त्यांची यादी
सिक्कीमचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लक्ष्मणप्रसाद आचार्य यांच्याकडे मणिपूरचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.
गुलाबचंद कटारिया यांची पंजाबच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. कटारिया यांची जागा आचार्य यांनी घेतली आहे.
कटारिया यांची केंद्रशासित प्रदेश चंदीगडचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे.
हरिभाऊ किसनराव बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
जिष्णू देव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल असतील.
ओम प्रकाश माथूर हे सिक्कीमचे नवे राज्यपाल असतील.
रामेन डेका यांची छत्तीसगडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
सीएच विजयशंकर यांची मेघालयच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.
कैलाशनाथन यांची पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या सर्व नियुक्त्या पदभार स्वीकारल्यापासून लागू होतील.