अतिवृष्टीने आठ लाख हेक्टरवरील पिके पाण्यात
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच दोन आठवड्यांपासून ते आजपर्यंत राज्यातील 19 जिल्ह्यातील 187 तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीमुळे आठ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून पीडित शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृषी आणि महसूल विभागाला दिले आहेत. राज्यात अतिवृष्टीमुळे जवळपास 21 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पशुधनाचीही मोठी हानी झाली असून, घरांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेती नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच दिले आहेत.
दरम्यान, राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्री भरणे यांनी धाराशिव, नांदेड, वाशिम भागात गेले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सर्वाधिक अतिवृष्टी झालेल्या नांदेड व वाशिम जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर असून, शेतकऱ्यांना भेटून त्यांच्या त्यानी व्यथा जाणून घेतल्या. नांदेड, यवतमाळ, अकोला, सोलापूर व हिंगोली जिल्ह्यांत शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. १० हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झालेल्यांमध्ये ११ जिल्ह्यांचा समावेश आहे.
तातडीने मदत दिली जाईल
प्रत्येक गावात झालेल्या नुकसानीचा अहवाल लवकरात लवकर सरकारकडे पोहोचवला जाईल व तातडीने मदत दिली जाईल. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याचे प्रश्न मी प्रत्यक्ष पाहिले आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तत्परतेने काम करावे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले असले तरी शासनाची ठाम भूमिका आहे. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल, अशी माहिती कृषिमंत्री भरणे यांनी दिली.
मुसळधार पावसाचा अनेक पिकांना फटका
सर्वाधिक बाधित पिकांमध्ये सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग आदींचा समावेश आहे. सोबतच, भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद आदी पीकांनाही फटका बसला आहे, असे भरणे यांनी सांगितले.