नवी मुंबई/ सावन वैश्य: वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर समाजात सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याची मोठी गरज आहे. कारण गुन्हेगार विविध शक्कल लढवून लोकांची फसवणूक करत आहेत. ही फसवणूक होऊ नये म्हणून श्रुती सुनील शिरसाट ही तरुणी पुढे आली आहे. बा. णा. बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, ठाणे आणि क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविणाऱ्या ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या प्रकल्पात त्यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित केला. या प्रकल्पातील सायबर वॉरियर्स आणि क्लबच्या अध्यक्षा म्हणून, श्रुती यांनी विद्यार्थ्यांपासून महिलांपर्यंत सर्व स्तरांवर सायबर जनजागृतीचे अभियान राबवले आहे.
श्रुती यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात सायबर क्लबच्या सचिव पदापासून केली. त्यांच्या कार्यक्षमतेला आणि निष्ठेला दखल देत १२ जानेवारी २०२५ रोजी भारताचे उपराष्ट्रपती “Shri C. P. Radhakrishnan” यांच्या हस्ते त्यांना ‘सर्वोत्कृष्ट सचिव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वगुणांमुळे आणि समाजातील बदल घडवण्याच्या जिद्दीमुळे १० जून २०२५ रोजी त्यांची सायबर क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदावर येताच त्यांनी सायबर जागरूकतेचा प्रसार समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचे ध्येय निश्चित केले.
अध्यक्षपदावरून त्यांनी ‘Cyber Shiksha for Cyber Suraksha’ या उपक्रमांतर्गत घाटकोपर, दिघा, ऐरोली, ठाणे, मुलुंड आणि रबोडी या परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये सत्रे घेतली. या उपक्रमांतर्गत त्यांनी २० सायबर वॉरियर्सना मार्गदर्शन केले, ज्यांनी सक्रियपणे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याचे कार्य केले. विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडियावरील धोके, ऑनलाईन गेमिंगमधील धोके याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
8 ऑक्टोबर 2025 रोजी कासारवडवली, ठाणे येथे मुख्यमंत्री सशक्तिकरण अभियानांतर्गत “लाडकी बहीण” योजनेत श्रुती शिरसाट यांनी महिलांसाठी विशेष सायबर जागरूकता सत्र आयोजित केले. या कार्यक्रमात त्यांनी 5 हजारहून अधिक महिलांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याचे उपाय समजावून सांगितले. उपस्थितांमध्ये अंगणवाडी शिक्षिका, डॉक्टर, परिचारिका, गृहिणी तसेच ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने होते. या मोहिमेमुळे महिलांमध्ये सायबर सजगता, सुरक्षा जागरूकता आणि आत्मविश्वास वाढला, तसेच समाजातील सशक्तिकरणाची प्रक्रिया ठळकपणे दिसून आली.
श्रुती शिरसाट यांचे ध्येय फक्त माहिती पुरवण्यापुरते मर्यादित नसून, प्रत्येक नागरिक सायबर सजग होऊन सुरक्षित डिजिटल समाज निर्माण करावा हे आहे. सचिव पदापासून अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास एका तरुणीच्या समर्पणाचा, नेतृत्वाचा, समाजसेवेच्या निष्ठेचा आणि सातत्यपूर्ण प्रेरणादायी कार्याचा प्रवास आहे. समाजातील सायबर सुरक्षेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या या ‘सावित्रीच्या लेकी’चा प्रवास दिवाळीच्या प्रकाशासारखा उजळतो’ वाचकांसाठी प्रेरणादायी ठरतो, आणि प्रत्येकासाठी संदेश देतो की मेहनत, धैर्य आणि समाजसेवा यामुळे बदल नक्कीच घडू शकतो.