
DCM Ajit Pawar Pune Press Confernce target bjp over Maharashtra Local Body Elections
Ajit Pawar Press Confernce : पुणे : पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवारांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पालिका निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. पुण्याचा त्रिकुट कारभार बदलण्याची गरज असून इच्छाशक्तीच्या अभावामुळेच शहराची अवस्था बिकट झाली आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार विकासकामे, कारभार आणि नागरी सुविधांचा विचार करतात. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक पुण्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले की, “२०१७ पासून आम्ही विरोधी पक्षात होतो, तर पुणे महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्या काळातील कारभार जनतेसमोर आला पाहिजे. प्रशासकांच्या काळात अपेक्षित कामे झाली नाहीत. नागरी सुविधा देण्यात अपयश आले. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मतदार वेगळ्या मुद्द्यांवर निर्णय घेतात. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत किती कामे झाली, कारभार कसा होता,” असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या…! अजित पवारांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर बावनकुळेंची नाराजी
पुण्यामध्ये भाजप सरकारच्या काळात मेट्रो आल्याचे रवींद्र चव्हाण म्हणाले आहेत. याबाबत अजित पवार म्हणाले की, “पुणे मेट्रो प्रकल्प मंजूर झाला होता. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळेच हा प्रकल्प मार्गी लागला. भविष्यात आणखी मोठ्या प्रमाणावर मेट्रोचे जाळे विस्तारण्याची गरज आहे. वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल आणि इतर पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवडमधील रस्त्यांचे रुंदीकरण पुण्याच्या तुलनेत अधिक झाले असल्याने तेथे फरक जाणवतो,” असे अजित पवार म्हणाले आहेत.
“पुणे महापालिकेवर भाजपची सत्ता असताना आम्ही विचारपूर्वक धोरणे आखली होती. मात्र स्थानिक नेतृत्वाने त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही, अशी टीका पवार यांनी केली. आवश्यक तो पाठपुरावा करण्यात अपयश आल्यामुळे पुणेकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ नंतर तब्बल नऊ वर्षे महापालिकेच्या निवडणुका न झाल्याने शहराच्या विकासावर परिणाम झाला,” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.
पुढे ते म्हणाले की, “नाराजी टाळण्यासाठी आम्ही काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. मात्र सध्या राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात या निवडणुका लढविण्याची वेळ आली आहे, असे पवार म्हणाले. काँग्रेससोबत सत्तेत असताना आम्ही स्थानिक पातळीवर विरोधात लढत होतो, मात्र सत्तेत एकत्र काम करायचो. सध्या परिस्थिती तशीच आहे. यापूर्वी ‘पुणे पॅटर्न’ होता आणि तेव्हा आम्ही भाजपसोबत एकत्र होतो. आजची परिस्थितीही त्याच धर्तीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”
हे देखील वाचा : इच्छुकांना राहुल नार्वेकरांनी दिली धमकी? व्हायरल व्हिडिओवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
“पुणे महापालिकेकडे निधी उपलब्ध असतानाही केवळ पाठपुरावा न केल्यामुळे पुणेकरांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्या प्रमाणात सुखसोयी मिळणे अपेक्षित होते, त्या मिळालेल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. टॉमटॉम ट्रॅफिक सर्व्हेमध्ये जगातील ५०१ शहरांपैकी वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुण्याचा चौथा क्रमांक लागतो. यामागे ठोस कारणे असून भूसंपादन करून रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच वाहतुकीची समस्या सुटू शकते,” असे अजित पवार यांनी सांगितले.
एकूणच पुण्याचा विकास अपेक्षित गतीने न होण्यामागे इच्छाशक्तीचा अभाव कारणीभूत असून शहराचा कारभार बदलण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करत पवार यांनी पुणेकरांना आगामी महापालिका निवडणुकीत याचा विचार करण्याचे आवाहन केले.