इस्लामपूर / विनोद मोहिते : वडिलांशी भांडण करून घराबाहेर पडलेला मूकबधिर तरुण धीरज प्रकाश कांबळे हा सतर्क रिक्षाचालकामुळे अवघ्या पाच तासानंतर सुखरूप घरी पोहोचला. तो बोलू शकत नव्हता. त्याला काय सांगायचे तो हातवारे करून माहिती देत होता, अशा परिस्थितीत पोलिसांनीही तो ‘जिथे मिळाला तिथे नेऊन सोडा’ असे फर्मान सोडले. पण हतबल न होता रिक्षाचालक त्याला घरी पोहचवण्यात यशस्वी झाला.
इस्लामपूर शहरातील पोलीस लाईनच्या पाठीमागे निर्मला सांस्कृतिक भवनजवळ राहणारा प्रकाश कांबळे मुलगा मूकबधिर आहे. त्याचे वडिलांसोबत भांडण झाले. म्हणून त्याने घर सोडले. फिरत फिरत तो शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या जावडेकर चौकात सायंकाळी सातच्या सुमारास आला. चालून तो थकला होता. खिशात २० रुपयांची नोट होती. ती दाखवत त्याने हातवारे करत मला घरी सोडा असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्याला बोलता येत नव्हते. नेमका पत्ताही सांगायला जमत नव्हते.
रिक्षाचालकाने हातवारे करून विचारल्यानंतर त्याने खाणाखुणा करत प्रयत्न केला. मात्र, रिक्षाचालकांना त्याला नेमके काय सांगायचे हे समजत नव्हते. हातवारे करून केला जाणाऱ्या हालचाली समजून घेण्यासाठी रिक्षाचालक अमोल पाटील यांनी आपला सहकारी मित्र सलीम मुल्ला यांच्यासह परिसरातील मुक्या तरुणाकडे धाव घेतली. त्याला त्याची भाषा समजते का? यासाठी प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला पुन्हा नेमके करायचे काय हा प्रश्न पडला.
एक-दोघांनी याच्या सारखाच दिसणाऱ्या हरवलेल्या तरुणाची माहिती बसस्थानकाच्या परिसरात कागदावर चिटकवली आहे, अशी माहिती दिली. रिक्षाचालकांनी बसस्थानक परिसरात धाव घेत भिंतीवरील चिटकवलेले कागदामधला तरुणाचा फोटो हाच आहे का ? याची खात्री केली. परंतु या मुलाचे छायाचित्र नसल्याने पुन्हा त्यांची निराशा झाली. तोपर्यंत बारा वाजले होते.
या रिक्षाचालकाने त्याला घरी पोहोचवण्याची व्यवस्था सुरू केली. असतानाच पोलीस ठाण्यात बेपत्ता झालेल्या मुलाच्या आईने धाव घेतली होती. तेव्हा पोलिसांनी रिक्षाचालकाचा संपर्क साधून पालक आल्याची कल्पना दिली. रिक्षाचालक अमोल पाटील यांनी आपल्या मित्राच्या मदतीने मुलाला त्याच्या घरी सुखरूप स्वाधीन केले. रात्रीचे एक वाजले होते. तब्बल पाच तासांच्या प्रयत्नानंतर आपले घर मिळाले या भावनेने तो मुलगा सुखावला होता. मुलगा सुखरूप आल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसून आला.
‘तो जिथे मिळाला तिथेचं नेऊन सोडा’
पोलीस स्टेशनला जाऊन मुलाला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्या स्टाईलने मुलाला जिथून आणला तिथेच नेऊन सोडा, असा आदेश दिला. तेव्हा रिक्षाचालक हतबल झाला. रिक्षाचालकांनी त्या तरुणाला घेऊन पुन्हा जावडेकर चौक गाठले. तिथे फळांचा ज्यूस प्यायला दिला. त्याच्याशी संवाद साधत कागद आणि पेन घेऊन त्याला लिहायला भाग पाडले. तेव्हा त्याने लिहिण्याचा प्रयत्न केला. धीरज या नावाचा अंदाज आल्याने संबंधित रिक्षाचालकाने काही मित्र परिवारांना ग्रुपवर नाव पाठवले. तेव्हा हा मुलगा निर्मला सांस्कृतिक भवन जवळचा असल्याची माहिती मिळाली.