जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जळगाव दौरा आहे. यानिमित्ताने ते महाराष्ट्रामध्ये आले असून महायुतीसाठी हा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणूकीपूर्वी पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्र दौरा राजकीय दृष्या महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, जळगावमध्ये लखपती दीदी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
लखपती दीदी मेळाव्यामध्ये संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत व कौतुक केले. तसेच योजनांसाठी आणि निधीसाठी धन्यवाद मानले, यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेचे देखील पंतप्रधानांसमोर माहिती देत कौतुक केले. फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिना 1500 रुपये दिले जात आहेत. ही योजना घोषित केली तेव्हा विरोधकांनी विधानसभेत खूप टीका केली. कोणी म्हणालं ही फसवी योजना आहे, कोणी म्हणालं 10 टक्के महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही, कोणी म्हणालं की महिलांना लाच देता का, महिलांना विकत घेता का, बहिणींनो या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असतं हे माहिती नाही. प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला तरी प्रेम विकत घेता येत नाही. हे अनमोल प्रेम आहे. आमच्या बहिणींचं प्रेम अनमोल आहे,” अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही
पुढे त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंतत फॉर्म भरणाऱ्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आत्तापर्यंत तीन हजार रुपये सव्वाकोटी खात्यात गेले आहेत. उर्वरित खात्यातही पैसे जायला सुरुवात झाली आहे. कोणाचा फॉर्म उशिरा आला तरी चिंता करू नका, 31 ऑगस्टपर्यंत भरलेल्या सर्व अर्जधारकांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्यांचे पैसे दिले जाणार आहेत. कोणात्याही बहिणीला वंचित ठेवणार नाही. सप्टेंबरमध्येही फॉर्म घेऊ, जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही, तोपर्यंत आम्ही थांबणार नाही,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहेत. त्यामुळे समान्य महिलांच्या मनातील अर्जाबाबतचे संभ्रम आणि भीती कमी झाली आहे.