वाहनांचा ताफा, वारकऱ्यांची कुचंबना अन् प्रशासन हतबल
पंढरपूर / नवनाथ खिलारे : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी यात्रेची लगबग प्रशासनापासून वारकरी फडकरी भाविकांपर्यंत दिसून येते. आषाढी यात्रा पालखी पायी सोहळ्यापूर्वीच विठ्ठल मंदिरात येऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मंत्री व व्हीआयपींचा ताफा आता वाढू लागला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहिले असता एका मंत्र्यांच्या वाहनामागे कार्यकर्ते व नातेवाईकांच्या इतर वाहनांची लांबच रांग दिसून येते. मात्र, या वाहनामुळे चौफाळापासून व्हीआयपी गेटपर्यंत चालत जाणाऱ्या वारकरी भाविकांची मोठी कुचंबना होते.
राज्याच्या विविध खात्याचे मंत्री व त्यांचे कार्यकर्ते, आमदार, नातेवाईक, व्हीआयपींच्या वाहनांचा ताफा पाहता प्रशासनही हतबल होते, अशी अवस्था आज विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात पाहायला मिळाली. यावेळी वारकरी भाविकांची मोठी कुचंबना झाल्याने स्थानिक नागरिकांतूनही याबाबत संताप व्यक्त होताना दिसत होता. राज्यात अथवा देशात एखादी घटना घडल्यास सर्वप्रथम राज्यातील धार्मिक स्थळे व विशेष मंदिरांना अलर्ट राहुन सावधानतेचा इशारा दिला जातो.
पंढरपुरातही पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा राबवली जाते. परंतु, व्हीआयपींच्या गाड्या थेट मंदिराला वेढा व गराडा घालत असतील आणि भाविकांची कुचंबना होत असेल तर मंदिर सुरक्षेचा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. यात्रा कालावधीत तर व्हीआयपी वाहनांचा ताफा येताच वारकरी भाविकांना बाजूला सरकण्यास सांगितले जाते. याचवेळी भाविकांच्या हातातील लहान मूल, महिला अथवा ज्येष्ठ नागरिक यांचा हात सुटून ते बाजूला जातात आणि याच दरम्यान त्यांची चुकामूक होऊन व्यक्ती हरवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
पोलीस प्रशासन बजावतेय विशेष भूमिका
हरवलेल्या व्यक्तींना शोधून काढण्यासाठी पोलीस प्रशासन विशेष भूमिका बजावते परंतु भाविक हरवला नाही पाहिजे यासाठी या ठिकाणी येणाऱ्या व्हीआयपी व्यक्तींचे वाहनांचा ताफा जर बंद केला आणि गणपती मंदिरापासून व्हीआयपी व्यक्तींनी चालत मंदिरापर्यंत आल्यास भाविकांनाही याचा त्रास होणार नाही. वाहनांच्या ताफांचा गराडा विठ्ठल मंदिराला पडणार नाही. किंबहुना वारकऱ्यांची कुचुंबनाही थांबेल, पोलीस प्रशासनाला सुरक्षेसाठी मुभा मिळेल परंतु हा निर्णय होण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडेही वारकऱ्यांचे लागलंय लक्ष
राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला येण्याअगोदरच याबाबत ठोस भूमिका घेत पावले उचलून निर्णय घेतल्यास वारकरी भाविक व स्थानिक नागरिकांना खरोखर न्याय मिळेल. विठ्ठल मंदिराची सुरक्षा पोलीस यंत्रणेकडे असल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या संमतीशिवाय या ठिकाणी कोणतेही वाहन प्रवेश करत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेकडेही वारकरी भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.