
Devyani Farande strongly opposed entry of Yatin Wagh and Vinayak Pandey in BJP Nashik politics
नाशिकमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये महाविकास आघाडीला खिंडार पाडले आणि शिवसेनेच्या दोन आणि कॉंग्रेसच्या एका नेत्याला गळाला लावले. यामध्ये माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे यांचा समावेश आहे. या तिन्ही आज भाजपमध्ये प्रवेश होणार होता. मात्र त्यांना भाजप पक्षाच्या कार्यालयाबाहेरच थांबवण्यात आले. या तिन्ही नेत्यांच्या प्रवेशाला नाशिकच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. या तिन्ही नेत्यांच्या पक्षप्रवेशाला निवडणूक प्रमुख देवयानी फरांदे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यासाठी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते पक्ष कार्यालयाबाहेर जमून ‘जय श्रीराम’ची घोषणाबाजी करत आहेत. यामुळे नाशिक भाजपमध्ये तणावपूर्ण वातावरण झाले आहे.
हे देखील वाचा : पक्षाचा बापच अनौरस, तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश…! खासदार संजय राऊतांचा महायुतीवर घणाघात
शिवसेनेतून हकालपट्टी
माजी महापौर असलेल्या नेत्यांना शिवसेना ठाकरे गटाने देखील बाहेरचा रस्ता दाखवला आहे. भाजपसोबत जाण्याच्या तयारीमध्ये असलेल्या विनायक पांडे आणि यतीन वाघ यांना शिवसेना ठाकरे गटातून काढून टाकण्यात आले. याबाबत खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया पोस्ट करत माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी लिहिले आहे की, “पक्ष विरोधी कारवायां बद्दल. नाशिक शिवसेनेचे विनायक पांडे आणि यतिन वाघ यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात येत आहे! जय महाराष्ट्र,” अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
हे देखील वाचा : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र
भाजप पदाधिकारी देवयानी फरांदे यांचा तीव्र विरोध
देवयानी फरांदे यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “निवडणूक प्रमुख असूनही त्यांना या पक्षप्रवेशासंदर्भात विश्वासात घेण्यात आले नाही. प्रभाग क्रमांक १३ मध्ये होणाऱ्या आजच्या प्रवेशाला त्यांनी स्पष्ट विरोध दर्शवला आहे. फरांदे यांनी प्रस्थापितांच्या विरोधात लढणाऱ्या हिंदुत्ववादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका मांडली आहे”. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देवयानी फरांदे यांच्याकडे होती आणि त्यांनी एक पॅनलही तयार केले होते. मात्र, विनायक पांडे, शाहू खैरे आणि यतीन वाघ यांच्या आजच्या पक्षप्रवेशामुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद उफाळून आल्याचे बोलले जात आहे.