ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचा खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला (फोटो - सोशल मीडिया)
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. तसेच ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. खासदार राऊत म्हणाले की, “ठाकरे बंधू एकत्र आल्याने काहीही फरक पडणार नसेल, तर त्यावर इतकी प्रतिक्रिया देण्याची गरज काय? काल त्यांच्या प्रवक्त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी युती कशी महत्त्वाची आहे, हे सांगत बसण्याची गरज नाही. 16 तारखेला भेटू. ठाकरे बंधूंनी मला सांगावं—भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं? गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय अखंड महाराष्ट्र, बेळगाव-कारवार सीमा किंवा मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायावर आवाज उठवणारा भाजपमध्ये कोण आहे?” असा सवाल खासदार राऊतांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : “अजेंठा कुठे आहे? ही स्वार्थाची अन् खुर्चीची युती; एकनाथ शिंदेंचे ठाकरे बंधूंवर टीकास्त्र
पुढे ते म्हणाले की, “बावनकुळे यांनी वेगळ्या विदर्भाची भाषा केली. त्यावेळी ठाकरे उभे राहिले, पण मुख्यमंत्री म्हणून त्यांना जाब विचारणं हे फडणवीस यांचं कर्तव्य होतं. तुम्ही आम्हाला मराठी माणसावर शिकवू नका. ठाकरे आहेत म्हणूनच तुम्ही मुख्यमंत्री झाला आहात. नाहीतर महाराष्ट्राचे तुकडे करून एखाद्या छोट्या भागाचे मुख्यमंत्री झाला असता. मुंबई महाराष्ट्रात ठेवण्यासाठी संघर्ष केला आहे. तुम्ही मराठी माणसासाठी केलेली दहा कामं दाखवा. गौतम अदानीसारख्या मोदींच्या मित्राला मुंबई विकणं ही मराठी माणसाची सेवा नाही. दोन ठाकरे एकत्र आले आहेत, भाऊ एकत्र आले आहेत. तुम्ही तुमचं बघा. सत्तेसाठी एकत्र आलो असाल, तर ठीक आहे. पण तुम्ही एकमेकांची चंपी-मालिश करायला एकत्र आलात का?” असा देखील टोला खासदार राऊत यांनी लगावला.
हे देखील वाचा : ‘युती झाली पण गळती…’; ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का; ‘या’ नेत्याने सोडली साथ
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर देखील जोरदार प्रहार केला. ते म्हणाले की, “मराठी माणसाची संघटना फोडली, बाळासाहेब ठाकरे यांनी उभी केलेली शिवसेना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून चुकीच्या हातात दिली. महाराष्ट्र हे पाप कधीही माफ करणार नाही, याचा बदला मुंबई महापालिका निवडणुकीत घेतला जाईल. शिंदे यांनी स्वतःच्या मुलांची काळजी घ्यावी. भाजप त्यांच्या पोरांना पळवणार आहे. भाजपने कुत्रे पकडण्याच्या पिंजऱ्यासारखी केंद्रं उघडली आहेत. शिंदे यांचा पक्ष चोरीचा आहे. शिंदेंच्या पक्षाची मुलं ही अनौरस आहेत. स्वतःची मुलं नाहीत, त्यांचा पक्ष चोरीचा आहे. ज्या पक्षाचा बापच चोरीचा आहे. बापच अनौरस आहे.अमित शाह यांनी या पक्षाला आपलं नाव दिलं आहे. कळेल तुम्हाला महापालिकेनंतर कोणाची मुलं, कोण पळवतंय ते,” अशी घणघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली.
ठाकरे बंधूंची युती झाली आणि कॉंग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. आता महाविकास आघाडीमध्ये राहिलेला राष्ट्रवादी शरद पवार गट काय भूमिका घेणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत खासदार राऊत म्हणाले की, “मुंबईतील जागांच्या संख्येनुसार आणि ताकदीनुसार जागावाटप होईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला सोबत हव्यात. मनसे-शिवसेनेचं जागावाटप पूर्ण झालं आहे. आकड्यांमुळे युती तुटता कामा नये. जिथे दुसऱ्या पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो, तिथे जागा सोडली पाहिजे. परिस्थिती बदलली असल्यास दोन्ही पक्षांनी जिंकण्याच्या दृष्टीने निर्णय घ्यायला हवा,” अशी सूचक प्रतिक्रिया खासदार राऊत यांनी दिली आहे.






