वाई : धोम वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिच्या जामिनाची मुदत संपल्याने पुढील सुनावणी पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. आजच्या सुनावणीत दुपारी मांढरेचा उलट तपास घेण्यात आला.
धोम वाई खून खटल्याची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास आज पुन्हा पुढे सुरु झाला. सुनावणीसाठी सरकारी वकील ॲड. उज्वल निकम हे वाई न्यायालयात आले होते. संतोष पोळ यालाही बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक न्यायालयात उपस्थित होते. न्यायालय परिसरात पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला न्यायालयाने एक वर्षांपूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव जमीन मंजूर केला होता. त्याची मुदत संपल्याने न्यायालयाकडे तिने प्रकृतीच्या कारणास्तव पुन्हा जमीन नियमित होण्यासाठी अर्ज केला. अशा खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरेला एकदा जामीन दिल्यानंतर पुन्हा जमीन देण्यात येत नाही व तिला पुन्हा जामीन मंजूर करू नये असे आरोपीचे वकील दिनेश धुमाळ यांनी न्यायालयाला सांगितले. यावर सरकारी वकील ॲड. उज्वल निकम यांनी सांगितले की, अशा खटल्यात माफीच्या साक्षीदाराला जमीन नियमित मंजूर करता येतो. अशा जमीन अर्जावर हरकत घेण्याचा काही प्रश्न नाही. पुढील सुनावणी पर्यंत जामीन कायम ठेवला व अर्ज न्यायालयाने दाखल करून घेतला. दुपारच्या सत्रात पुन्हा ज्योती मांढरेच्या उलट तपास घेण्यात आला. सुनावणीच्या वेळी संतोष पोळ न्यायालयाच्या पुढच्या बाजूला बसलेला दिसल्याने सरकारी वकील उज्वल निकम यांनी त्यास हरकत घेत न्यायालयाला त्यास मागे बसवण्यास सांगितले माफीच्या साक्षीदारावर समोर बसल्याने परिणाम होतो असे त्यांनी सांगितले त्याप्रमाणे त्यास मागे बसविण्यात आले.