Dilip Walse Patil
मंचर : राज्यामध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. मात्र त्यापूर्वी राज्याचे राजकारण रंगले आहे. इच्छुकांची घाई सुरु आहे तर पक्षश्रेष्ठींची मोर्चेबांधणी सुरु आहे. सभा, बैठका आणि चर्चा यांचे सत्र वाढले आहे. सर्व पक्ष जागांची चाचपणी करत असून आढावा घेत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे पाटील यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आले आहे. दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये मुलीचा उल्लेख केल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. माझी मुलगी विधानसभा लढवण्यासाठी अजिबात तयार नाही म्हणून नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल, असे विधान दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.
बदनामी करतात, खोटनाटं सांगतात
मंचर येथील सभेमध्ये बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये विजयाचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, मागील 30-35 वर्ष तुम्ही मला पाठिंबा दिला. तुम्ही मला सांभाळलं आमदार म्हणून मला विधानसभेला पाठवलं. आपण अनेक शेतीचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, विजेचे प्रश्न सोडवले. पुढचे पाच वर्ष मी आता रात्रंदिवस काम करणार आहोत. अनेक लोक बदनामी करतात, खोटनाटं सांगतात. काहीना काही बोलतात. मात्र, त्यांच्या कोणत्याही बोलण्याला मी आज उत्तर देणार नाही. वेळ आल्यावर मी त्या संदर्भात उत्तर देईल आणि वस्तुस्थिती सांगेन, असे स्पष्ट मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले.
नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल
पुढे दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या मुलीचा उल्लेख केला. दिलीप वळसे पाटील यांची मुलगी राजकारणामध्ये येणार असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत उत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, विधानसभेची निवडणूक आम्हाला मोठ्या ताकतीने आणि हिंमतीने लढवायची आहे. जिंकायचे पण आहे आणि ते आपण जिंकणारच आहोत. काही लोक मुद्दाम अशी बातमी पसरवत आहेत की दिलीप वळसे पाटील निवडणूक लढवणार नाहीत, तर त्यांची कन्या लढवणार आहे. माझी कन्या निवडणूक लढवायला अजिबात तयार नाही त्यामुळे नाईलाजाने मलाच निवडणूक लढवावी लागेल”, असे मत दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.