पिंपरी-चिंचवड: महाराष्ट्र दिन (१ मे) निमित्त राज्यातील ८०० पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे. या यादीत पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील तीन अधिकारी आणि दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, विठ्ठल साळुंखे आणि सुहास आव्हाड यांना हे पदक प्रदान करण्यात आले आहे, तर पोलीस हवालदार विकास राठोड आणि नितीन ढोरजे यांनाही हा सन्मान मिळाला आहे.
महाराष्ट्र पोलीस दलात विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती गुणवत्तापदक आणि शौर्य पदक प्राप्त झाल्यानंतर पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते. यंदा १८० अधिकारी आणि ६२० कर्मचाऱ्यांना हा गौरव प्राप्त झाला आहे. पदक प्राप्त सर्व पोलिसांचे पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे.
‘शासनाच्या सर्व सेवा 15 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी आदेश जारी केला आहे. यात महाराष्ट्र पोलीस दलातील विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच राष्ट्रपतींच्या गुणवत्तापूर्ण सेवा पदक व शौर्य पदकाने गौरविण्यात आलेल्या पोलीस अधिकारी व अंमलबदारांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येत आहे. शुक्ला यांनी सर्व सन्मानप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदनही केले आहे.
या पुरस्कारासाठी जाहीर झालेल्या यादीत सर्वप्रथम मुंबईतील राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त शारदा राऊत यांचे नाव आहे. त्याचबरोबर, पोलीस उपमहानिरीक्षक अनिल पारसकर, एम. रामकुमार, पोलीस अधीक्षक जयंत मीना, श्रवण दत्त एस., राज तिलक रोशन, ऋषिकेश रावले आणि एम. रमेश या आयपीएस अधिकाऱ्यांचाही या यादीत समावेश आहे.
या यादीत 14 पोलिस अधिक्षक, 3 अप्पर पोलिस अधिक्षक आणि 10 उपअधिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच 58 पोलिस निरीक्षक, 22 सहायक पोलिस निरीक्षकांनाही पोलिस महासंचालक पदाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, नाईक आणि पोलिस शिपायांचाही यांनाही या पदकाने गौरविण्यात येणार आहे. याचवेळी एक गेल्या काही महिन्यांपासून देशभरात चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील पोलीस दलातील केवळ एकच नाव आहे.
पोलीस महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड झालेल्या ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या यादीत बीड जिल्ह्यातून फक्त एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश झाला आहे. बीड पोलीस दलातील हवालदार दीपक उदयसिंग रहेकवाल यांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांमध्ये बीड पोलीस दलातील काही अधिकारी व कर्मचारी सरकारच्या टप्प्यात आले असून, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर काहींना निलंबित करण्यात आले आहे तसेच काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या आहेत.