
जगभरात पोहोचला पुणेरी फराळ! जपानला सर्वाधिक पार्सलची नोंद; टपाल विभागाला लाखोंचा महसूल
पुणे/प्रगती करंबळेकर : दिवाळीचा सण आला की पुणेकर आपल्या परदेशातील नातेवाईकांना घरचा फराळ पाठवतात. यंदा ही परंपरा सुरु ठेवत, पोस्टाद्वारे जगातील ३० हून अधिक देशांमध्ये तब्बल ११,५०० किलो दिवाळी फराळ रवाना करण्यात आला आहे. या उपक्रमातून टपाल विभागाला ८४ लाख रुपयांचा महसूल मिळाला असून, सर्वाधिक २३५ पार्सल जपानला पाठविण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी परदेशात असलेल्या आपल्या नातेवाईकांसाठी फराळाची पार्सल पाठवली. या पार्सलमध्ये चकली, करंजी, लाडू, चिवडा, शेव, अनारसे आदी पारंपारिक पदार्थांचा समावेश होता. सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू झालेल्या या सेवेतून जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, रशिया, कॅनडा, फ्रान्स, नॉर्वे, न्यूझीलंडसह विविध देशांमध्ये पार्सल पोहोचविण्यात आली आहेत.
टपाल विभागाकडून दरवर्षी दिवाळी काळात परदेशी पार्सलसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाते. फराळाचे वजन, पॅकिंग आणि आंतरराष्ट्रीय टपाल नियमानुसार तपासणी करून या पार्सलची प्रक्रिया केली जाते. या काळात मुख्य आणि उपटपाल कार्यालयांत विशेष काऊंटर सुरू ठेवण्यात आले होते.
तथापि, यंदा अमेरिकेत फराळ पाठविण्यास विलंब झाला. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात कर आकारणी केल्याने भारतानेदेखील अमेरिकेत टपाल पाठविण्यावर काही काळ निर्बंध आणले होते. त्यामुळे अमेरिकेसाठी रवाना होणाऱ्या पार्सलची संख्या लक्षणीयरीत्या घटली आणि महसूलात घट झाली, असे टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही, जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपातील देशांकडून वाढलेल्या मागणीमुळे यंदाही टपाल विभागाने विक्रमी पार्सल वितरण केले आहे.
यावर्षी परदेशी फराळ पाठविण्यात घट
गेल्या वर्षी तब्बल १८,००० किलो फराळ परदेशात पाठविला होता. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी परदेशी फराळ पाठविण्यात काहीशी घट झालेली दिसून येत आहे. टपाल विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी पाठविलेल्या फराळाचे प्रमाण जवळपास साडेअकरा हजार किलो इतके राहिले आहे, म्हणजेच सुमारे सहा ते साडेसहा हजार किलोची घट झाली आहे.
परदेशी पाठविण्यात आलेला फराळ
| देश | पार्सल संख्या | महसूल | एकूण किलो |
|---|---|---|---|
| जर्मनी | १९० | ११.४२ | १९३२ |
| जपान | २३६ | ९.४३ | १७८७ |
| ऑस्ट्रेलिया | ११४ | ९.२८ | ८७८ |
| इंग्लंड | १४१ | ८.७७ | १२४५ |
| रशिया | ८८ | ६.८९ | ९६९ |
| अमेरिका | ८० | ४.६२ | ४३२ |
| कॅनडा | ३४ | २.५० | २५४ |
| आर्यलंड | २८ | २.१० | २६९ |
| न्यूझिलंड | २१ | २.१ | १८४ |
| फ्रांस | ३० | १.८० | २७६ |
| नॉर्वे | २३ | १.६८ | २२६ |
| सिंगापूर | ४८ | १.६२ | २९८ |
| नेदरलँड | २१ | १.१० | १४४ |
| युएई | ३६ | १.७ | २८२ |
| फिनलँड | १२ | ०.९५ | १६४ |
| स्वीडन | १२ | ०.६५ | ७२ |
| जॉर्जिया | ७ | ०.६१ | १०७ |
| साऊथ कोरिया | ११ | ०.६१ | १२८ |
| इतर देश | २६७ | १४.८३ | १९२८ |
| एकूण | १४२४ | ८३.२६ | ११,७४६ |