
सोलापुरात गणपती मिरवणुकांतील डॉल्बी-डीजे हद्दपार; जनतेच्या उठावाला प्रशासनाची साथ
सोलापूर : मिरवणूक तीच…मिरवणुकीला झालेली तुडुंब गर्दी तीच…मिरवणुकीतला शिगेला पोहचलेला उत्साह सुद्धा तोच…मिरवणुकीचे रस्ते तेच आणि मिरवणुका काढणारे सोलापूरकर सुद्धा तेच…अर्थात सोलापूर तेच आणि सोलापुरातली मिरवणूकसुद्धा तीच…पण या मिरवणुकीत ना डॉल्बीचा दणदणाट ना डीजेचा कर्णकर्कश आवाज…ना धिंगाणा ना धुमाकूळ. वाजली ती फक्त पारंपारिक वाद्ये; पावलं नाचली ती फक्त लेझीमच्या तालावर आणि हलगीच्या ठेक्यावर, मिरवणुकीत दिसला तो फक्त आणि फक्त सात्विक भक्तिभाव आणि निर्मळ उत्साह.
हे चित्र आहे उत्सव प्रिय सोलापूर शहरातील बदलत्या मिरवणुकांचे. मिरवणूक म्हणजे सोलापूर आणि सोलापूर म्हणजे मिरवणूक असे समीकरण असणाऱ्या सोलापुरात हा सकारात्मक बदल गेल्या काही वर्षापासून सातत्याने दिसून येत आहे. याला कारणीभूत ठरला तो इथल्या नागरिकांनी केलेला उठाव, त्यास प्रशासनाने दिलेली खंबीर साथ आणि पारंपारिक लेझीम खेळाकडे वळलेली उत्सव मंडळे. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नामुळे सोलापूर शहरातून पहिल्यांदा डीजे आणि डॉल्बी हद्दपार झाली. हाच कित्ता गिरवत ग्रामीण मधील नागरिक आणि ग्रामीण प्रशासनाने डॉल्बी व डीजेला नो एंट्री म्हटले आणि संपूर्ण जिल्ह्यातील उत्सव हा उत्सवासारखा साजरा होऊ लागला.
सोलापूर हे उत्सवप्रिय शहर आहे. वर्षातील बाराही महिने सोलापुरात कोणता ना कोणता उत्सव साजरा होतच असतो आणि त्या त्या उत्सवाची सांगता भव्य दिव्य मिरवणुकीनेच होत असते. त्यामुळे मिरवणुकांचे शहर अशी सोलापूरची ओळख तयार झालेली आहे. अशा मिरवणुकांच्या सोलापूर शहरांमध्ये केस तर केस १६ बेस असे म्हणत अनेक उत्सव मंडळेही डीजे आणि डॉल्बी लावून सोलापूरचे वातावरण दणाणून सोडत असत. कानठळ्या बसवणारा गोंगाट, हृदयाची धडकी भरवणारा डॉल्बी-डीजेचा दणदणाट, त्यातून होणारे प्रचंड ध्वनीप्रदूषण यामुळे सोलापूरकरांचे सोलापुरात राहणे कठीण झाले होते, उत्सव काळात सोलापुरातील काही रुग्णांना प्राणास मुकावे लागले होते.