लाडक्या बहिणींनो, e-KYC बंधनकारक असली तरी काळजी करू नका; 'या' स्टेप्स् फॉलो करा अन् KYC करून घ्या
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मात्र, यामध्ये अनेक बोगस नावे, नियमबाह्य पद्धतीने अनेक महिला लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे. यासाठी सरकारने एक खास वेब पोर्टल तयार केले आहे.
ई-केवायसी अंतर्गत लाभार्थी महिलांना या पोर्टलवर जाऊन आपली ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत पूर्ण करायचे आहे. ज्या महिला ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करतील, त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल, असे शासनाने स्पष्ट केले आहे. लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आहे. त्यामुळे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य केले जाते. राज्याच्या महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
हेदेखील वाचा : राज्यातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी योजनेतून ठरल्या बाद; अनेकांच्या खात्यात पैसे तर हजारो महिला अद्यापही प्रतिक्षेत…
ई-केवायसीची माहिती देताना सांगितले आहे की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी वेब पोर्टलवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी शुक्रवारपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी’.
आधार क्रमांकही आवश्यक
महिला व बालविकास विभागाने यासंबंधीचे एक परिपत्रकही काढले आहे. आधार कायद्यातील तरतुदींनुसार या योजनेच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आता विभागामार्फत ई-केवायसीच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी व प्रमाणीकरण केले जाणार आहे.
अशी पूर्ण करा ई-केवायसी…
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट देऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
– मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभर्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा. यानंतर नवीन वेबपेज ओपन होईल.
– e-KYC – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या पेजवर लाभार्थी आधार क्रमांक नोंदवावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड नोंदवा, तो नोंदवताना चूक होणार नाही याची दक्षता घ्या. कॅप्चा कोड नोंदवल्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या.
– आधार प्रमाणीकरण संमतीमधील मजकूर वाचून मी सहमत आहे, या पर्यायावर क्लिक करा. यानंतर ओटीपी पाठवा हा पर्याय निवडा, यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी मिळेल.