राज्यातील तब्बल 26 लाख लाडक्या बहिणी योजनेतून ठरल्या बाद; अनेकांच्या खात्यात पैसे तर हजारो महिला अद्यापही प्रतिक्षेत... (File Photo : Ladki Bahin Yojana)
मुंबई : लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, अजूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. येत्या दोन दिवसांत उर्वरित महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. मात्र, 26 लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत, अशी माहिती मिळाली आहे.
लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केले होते. त्यातील काही महिलांनी निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला होता. त्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात आली आहे. त्यातून लाखो महिलांना बाद करण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, 26 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना पैसे मिळणार नाहीत, अशी माहिती पुढे आली आहे.
हेदेखील वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुनर्पडताळणी अद्यापही सुरुच; ‘इथं’ तब्बल 3500 महिला ठरल्या बाद
दरम्यान, लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेल्या महिलांची अनेक कारणे आहेत. त्यात २१ ते ६५ वयोगटातील महिला लाभ घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त वयोगटातील महिलांना बाद केले आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
चारचाकी वाहन असेल तरीही लाभ नाही
चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही. एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
पैसे येणार की नाही असे करा चेक…
सर्वात आधी तुम्हाला राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सेक्शनवर क्लिक करायचे आहे. यानंतर चेक पेमेंट स्टेट्सवर क्लिक करा, यानंतर तुमचा आधार नंबर आणि बेनिफिशियरी आयडी टाका. यानंतर तुम्हाला सर्व पेमेंट स्टेट्स दिसणार आहे. याचसोबत फोन नंबरशी लिंक असणाऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत की नाही चेक करा.