मुंबई : दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai Suicide Case) आत्महत्या प्रकरणामधील आरोपी रशेस शहा आणि इतरांचे फोन बंद असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यासोबतच आरोपी घरात आणि कार्यालयातही नसल्याचे समोर आले आहे. नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु असताना संबंधित प्रकरणातील आरोपी का फरार झाले? त्यांनी फोन का बंद केला? नितीन देसाई आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या गंभीर आरोप सत्य आहेत का? असे अनेक प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहेत. सध्या सर्वत्र नितीन देसाई यांच्या मृत्यूची आणि प्रकरणातील आरोपींची चर्चा रंगली आहे.
देसाई यांनी एडलवाईज कंपनीकडून 180 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण घेतलेल्या कर्जावरील व्याज वाढत जात कर्ज तब्बल 252 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, कोरोना महामारी आल्यामुळे कर्जाचे हप्ते फेडणे नितीन देसाई यांच्यासाठी कठीण झाले होते. म्हणून आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांनी स्वतःचे आयुष्य संपवले अशी माहिती समोर आली. मानसिक त्रास होत असल्यामुळे नितीन देसाई यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला असं देखील त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं. जीवन संपवण्याआधी त्यांनी काही ऑडिओ रेकॉर्डिंग्स केले होते.
प्रचंड मोठा डेटा त्यांनी आत्महत्येपूर्वी स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी स्वतःचा जीवनप्रवास, एनडी स्टुडिओचा प्रवास. तसेच आलेल्या संकटांबद्दल ऑडिओमध्ये सांगितलं आहे. पण इतर कोणावरही आरोप न करता त्यांनी फक्त एडलवाईज कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. अशात या कंपनीचे अधिकारी फरार असल्यामुळे नक्की सत्य काय? याची चर्चा रंगत आहे.