मुंबई : विद्यार्थी आता मनुस्मृती आणि भगवद्गीतेचे धडे शाळेमध्ये घेणार असल्याची चर्च सर्वत्र रंगली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ‘एससीईआरटी’ने महाराष्ट्र राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला असून त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवल्या आहेत. तिसरी ते बारावीची पाठ्यपुस्तकं बदलली जाणार आहेत. मात्र यामध्ये मनुस्मृती, मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचे श्लोक घेण्यात आले आहेत. या निर्णयाला शरद पवार गटाकडून जोरदार विरोध केला जात आहे. तर हिंदू जनजागृती समितीकडून याचे स्वागत करण्यात आले आहे. यावर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्लोकात एकही चूक नाही
शालेय अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती, मनाचे श्लोक आणि भगनद्गीतेचा समावेश करण्याचा विचार करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना दीपक केसरकर म्हणाले, “मनुस्मृतीमधील तो श्लोक आक्षेपार्ह नाही. तो श्लोक अतिशय चांगला आहे. त्या ग्रंथातील अनेक भागांवर लोकांचे आक्षेप आहेत. सर्वसाधारणपणे त्यातील काही ठराविक भागांवर आक्षेप असून आमचं त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. आम्ही त्याचं समर्थन किंवा प्रचार करत नाही. मनुस्मृतीतील आक्षेपार्ह मजकुराचा आम्ही प्रचार करत नाही. मात्री ज्या श्लोकाचा अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे त्या श्लोकात एकही चूक नाही. त्यावर आक्षेप घेणाऱ्यांनी या श्लोकातील एक तरी चूक दाखवावी. राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक्रमात तो श्लोक शिकवला जातोय. सीबीएसई बोर्ड तो श्लोक शिकवत आहे,” असे मत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले आहे.
कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी
राज्यसरकारमध्ये अजित पवार गट देखील सामील झाला आहे. या निर्णयाला शरद पवार गटाकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. यानंतर अजित पवार गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार मनुस्मृतीच्या निर्णयावर म्हणाले, आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असेपर्यंत असं काही होऊ देणार नाही. तुम्ही (जनतेने) या गोष्टीची काळजी करू नका. आम्ही जी विचारधारा घेऊन पुढे चाललो आहोत त्या विचारधारेला कुठेही धक्का लागला तर आम्हाला ते चालणार नाही. त्यासाठी कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मागे हटणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.