Environment Minister Pankaja Munde's first reaction on the Beed Sarpanch Santosh Deshmukh murder case
बीड : राज्यामध्ये सध्या बीड हत्या व परभणी हिंसाचार प्रकरणावरुन वातावरण तापले आहे. राज्यातील या गुन्हेगारींच्या घटनेवर नागरिकांनी रोष व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यांना अगदी शारिरीक त्रास देऊन त्यांची हत्या करण्यात आल्यामुळे हे प्रकरण देशभर गाजत आहे. यावर विधान परिषदेच्या आमदार व मंत्री पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
बीड अत्याचार प्रकरणामध्ये वाल्मिक कराड या व्यक्तीचे नाव पुढे येत आहे. हा वाल्मिक कराड फरार असून त्याला राजकारणातून संरक्षण देत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध असल्याचे देखील बोलले जात आहे. कॉंग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौरा करुन या मुद्द्यांवरुन महायुतीवर निशाणा साधला होता. मात्र तरीही या प्रकरणावर बीडचे माजी पालकमंत्री व मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी कधीही खोटं सांगणार नाही. मी या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एसआयटी लावण्याची मागणी केली आहे. राज्यामध्ये पहिल्यांदा कोणी ही मागणी केली असेल तर ती मी आहे. गोपीनाथगडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशीच मी ही मागणी केली होती,” असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
क्राईम न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे त्या म्हणाल्या की, “या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप व निषेध व्यक्त करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेतील. फडणवीस हे माझ्या त्या लेकराला नक्की न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता. तो माझ्यासोबत काम करत होता. माझ्यासोबत त्याने चांगला सरपंच म्हणून काम केलेलं आहे. संतोष देशमुख यांच्या घरच्यांना न्याय देतील असा मला विश्वास आहे,” असे मत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.
पंकजा मुंडे यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेले आहे. पंकजा मुंडे यांना पर्यावरण मंत्री म्हणून कार्यभार मिळाला आहे. याआधी माणसांची सेवा केली आता पर्यावरणाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे, अशी भावना पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यापूर्वी देखील बीडचे आमदार धनंजय मुंडे व पंकजा मुंडे हे या प्रकरणावर प्रतिक्रिया का देत नसल्याचा सवाल उपस्थित केला होता. अखेर मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.