स्वारगेट अत्याचार प्रकरणावर खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया (फोटो- सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापलेले दिसून येत आहे. तसेच बीड हत्या व परभणी प्रकरणामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांचे पुढील पाच वर्षांची विकासाची दृष्टी आणि विकासकामांचा लेखाजोखा मांडला. यामध्ये फडणवीस यांनी गडचिरोलीमधील नक्षलवाद आणि विदर्भातील सिंचन प्रकल्पावर जास्त भर दिला. आता नक्षलवादवरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी महायुतीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. खासदार राऊत म्हणाले की, “अत्याचार करणारे सर्व लोक कल्याण, अंबरनाथ आणि बीडलाच का असतात असा सवाल देखील खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. खासदार राऊत म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर तुम्ही केला. आता हे लोक गप्प का आहेत? बीडमध्ये धक्कादायक चित्र आहे. बीडमधला हा प्रकार पूर्वी बिहारमध्ये सुरु असायचा. अपहरण, हत्या, खंडणी, टोळ्यांचा दहशवात, राजकीय हत्या आणि त्यांना संरक्षण असं आधी बिहारचं चित्र होतं. आता हे तुम्हाला कल्याण, ठाणे, अंबरनाथ आणि बीडमध्ये दिसून येत आहे,” असा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्र राजकारणसबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे. पण मग बीडमध्ये कोण आहेत? ती काय तुमची पोरं आहेत की जावई आहेत. त्यांना संरक्षण दिलं जात आहे. बीडमध्ये मागील काही वर्षांत 38 हत्या झाल्या आहेत. या सर्व हत्या राजकीय कार्यकर्त्यांच्या असून त्यातील बहुतांश वंजारी समाजातील कार्यकर्ते आहेत. बीडमधील हा नक्षलवाद हा अर्बन नक्षलवाद आहे. तो आधी संपवा. कारण तो देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे. ते सांगतात तो वैचारिक असेल पण बीडमध्ये जो सुरु आहे त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्ते, नेते, खासदार व आमदार यांच्या हातामध्ये बंदुका दिल्या गेल्या आहेत. तू भररस्त्यात खून करतात आणि तो खून पचवला जातो.बीडमधील या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का?” असा सवाल खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पुढे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, “आपल्या पक्षातील नेत्यांच्या गुन्हांवर पांघरुण घालण्यासाठी तुम्हाला गृहमंत्री पद मिळालेलं नाही. हे तुम्हाला भगिनींचं रक्षण करण्यासाठी मिळालेले आहे. आपल्याला खूप लाडक्या बहिणींची चिंता आहे. परळींच्या भागातील लाडक्या बहिणींचं कुंकू पुसल्या गेलेले आहे. आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. या विधवा लाडक्या बहिणींसाठी खरोखर भाऊ असतील तर कायद्याने बदला घेतील. पण देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे लाडक्या बहिणींच कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांना संरक्षण देत आहेत,” असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.