
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून मराठा बांधव मोठ्या संख्येने मैदानात जमू लागले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हेही आज आझाद मैदानावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आजचा दिवस मराठा आरक्षण प्रश्नासंदर्भातील राजकीय घडामोडींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
रविवारी रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र काही कारणास्तव ती बैठक रद्द करण्यात आली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे दरे गावातून तातडीने मुंबईकडे रवाना झाले होते. आज ही बैठक होण्याची शक्यता असून तिन्ही नेते मराठा आरक्षण आंदोलनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला तोडगा निघण्याची आणि त्यांच्या मागणीला यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लक्षणीय बाब म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा समाजातील लोक मुंबईकडे कूच करू लागले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईचा परिसर आंदोलकांनी गजबजू लागला आहे. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी आझाद मैदान परिसरातील खाण्या-पिण्याची दुकाने बंद ठेवून आंदोलकांची रसद तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर राज्यभरातून संतापाचा उद्रेक झाला. दरम्यान, आंदोलकांना मदतीचा ओघ सुरू असून राज्यभरातून भाकरी, ठेचा, चिवडा यासारख्या साहित्याचा मोठ्या प्रमाणात पुरवठा मुंबईला होत आहे. समाजातील सर्व स्तरांतून ही मदत आता आझाद मैदानावर पोहोचवली जात असून आंदोलनाला उर्जा मिळत आहे.