'शक्तिपीठ'ला इथं मिळतोय चांगला पाठिंबा; शेतकरी स्वेच्छेने देताहेत जमिनी
धाराशिव : नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला धाराशिव जिल्ह्यातील 13 शेतकऱ्यांनी स्वेच्छेने आपली जमीन देऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचा आदर्श प्रस्थापित केला आहे. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या पुढाकाराने इतर शेतकऱ्यांना विकासात ‘शक्ती’ दिली तर काय साध्य करता येते, याचा समृद्ध मार्ग दाखवला आहे.
महालांगी गावातील या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे ९ हेक्टरहून अधिक जमीन प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिली आहे. धाराशिवचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्वेच्छेने जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना २५ टक्के अतिरिक्त बोनस, तसेच प्रशासनाशी सातत्याने झालेल्या संवादामुळे हा निर्णय शक्य झाला. गावातील जमिनीचे मोजमाप कोणत्याही विरोधाविना पूर्ण झाले असल्याचे ही त्यांनी नमूद केले. तर शक्तीपीठ महामार्गासाठी चार एकर जमीन देणारे बाबन गुंड यांनी सांगितले की, प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर ते समाधानकारक आहेत.
जमिनीचा दर ठरवताना रेडी रेकनरनुसार असलेले मूल्य आणि सध्याच्या बाजारभावाचा ताळमेळ साधला जाईल. त्यानंतर ठरलेल्या किंमतीच्या पाचपट नुकसानभरपाई दिली जाईल. याशिवाय, आम्ही स्वेच्छेने जमीन देत असल्याने २५ टक्के अतिरिक्त बोनस मिळण्याची शक्यता आहे, असे गुंड यांनी सांगितले.
जमीन संपादित करणार
जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्या व जमीन संपादनासंबंधीची एकूण परिस्थिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) कळवित आहे. धाराशिव, तुळजापूर तालुक्यांतील एकूण सुमारे ४६८ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करावी लागणार असल्याचे उपजिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडूनही मिळतोय सकारात्मक प्रतिसाद
सुमारे ८०२ किमी लांबीचा हा महामार्ग राज्यातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे. महालांगी गावातील शेतकऱ्यांच्या भूमिकेनंतर इतर शेतकऱ्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. गावकऱ्यांच्या या निर्णयानंतर इतर शेतकरीही अशाच प्रकारे पुढे येतील, अशी शक्यता असल्याचे ही यादव यांनी स्पष्ट केले.