शेतकऱ्यांचा मोर्चा मंत्रालयात धडकणार; विविध मागण्यांसाठी अर्धनग्न राहून करणार निषेध
वाशिम : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत. त्यात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. याचा निषेध करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी मुंबई मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढणार आहेत. यातील लाखो शेतकऱ्यांनी आधीच मुंबईच्या दिशेन कूच केली आहे. बुधवारी (दि.१२) हा मोर्चा मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहे.
वाशिम जिल्ह्यातील शेतकरी नेते सतीश इढोळे यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, वीजबिल माफी, शेतीसाठी पुरेसा पाणीपुरवठा यांसह विविध मागण्या शेतकऱ्यांकडून केल्या जात आहे. मात्र, या मागण्यांकडे सरकारकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांनी आता थेट मुंबईतील मंत्रालयावर अर्धनग्न मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे. 12 फेब्रुवारी रोजी हजारो शेतकरी मुंबईतील मंत्रालयावर धडकणार आहेत.
दरम्यान, शेती व्यवसाय डबघाईला आला असून, त्याला कारण राज्य सरकारची धोरणे आहेत. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. आज शेतकऱ्यांसाठी कृषीमूल्य आयोग नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांना त्यांना भाव ठरवता येत नाही. त्यांच्या उत्पादनांचे भाव ठरवण्याचा अधिकार भांडवलदारांकडे आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे केलं जातंय दुर्लक्ष
शेतकऱ्यांच्या मागण्यांबद्दल विविध आंदोलन करण्यात आले. उपोषण, रास्ता रोको, आत्महत्येचा इशारा आणि अवयव विक्रीसारख्या टोकाच्या पद्धतींचा अवलंब करूनही शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारने कानाडोळा केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
…तर तीव्र आंदोलन करणार
या संदर्भात शेतकरी नेते सतीश इढोळे, बालाजी मोरे आणि विशाल गोटे यांच्या नेतृत्वाखालील पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त
नाफेडचे सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहे. नाफेडचे हमीभाव खरेदी केंद्र बंद झाल्याने 23 हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी विना राहिले आहेत. त्यामुळे याच सोयाबीनची हमीभावाने खरेदी केली जावी. या मागणीसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्ते गणेश ढवळे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी सोयाबीनची उधळण करून आंदोलन केलंय.