राज्यातील प्राचार्यांसाठी आनंदाची बातमी ! निवृत्तीचे वय 62 वरून होणार 65 वर; उच्च शिक्षणमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण संकेत
तासगाव : तालुक्यातील वडगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाच्या नावानं चांगभलं सुरू असल्याचं दिसून आलं. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात 136 विद्यार्थी शिक्षण घेतात. शुक्रवारी दिवसभर या विद्यार्थ्यांची जबाबदारी फक्त 3 शिक्षकांवर होती. मुख्याध्यापक शाळा तपासणीला गेले होते. तर दोन शिक्षक ट्रेनिंगला होते. एक शिक्षिका इतर शाळेत शिकवण्यासाठी गेल्या होत्या. तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी या सगळ्या कारभाराचा पंचनामा केला.
तासगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा कारभार अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. निमणी शाळेतील झिरो शिक्षिका प्रकरण आणि बस्तवडे शाळेतील रजा न घेता शिक्षकांच्या ‘दांड्या’ जिल्हाभर गाजत आहेत. निमणीप्रकरणी अविनाश गुरव व इतरांचे निलंबन झाले आहे. तर बस्तवडे प्रकरणी कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या टेबलवर आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील हा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असताना वडगाव जिल्हा परिषद शाळेचा कारभार चर्चेत आला आहे. याठिकाणी पहिली ते सातवीपर्यंत वर्ग आहेत. त्यामध्ये 136 विद्यार्थी शिक्षण घेतात. तर मुख्याध्यापकांसह 7 शिक्षक याठिकाणी अध्यापनाचे काम करतात. शुक्रवारी शाळेत 129 विद्यार्थी उपस्थित होते.
3 शिक्षकांवर 129 विद्यार्थ्यांची जबाबदारी
या विद्यार्थ्यांची जबाबदारी केवळ 3 शिक्षकांवर होती. एकूण 7 शिक्षकांपैकी मुख्याध्यापक मोहन सौंदडे हे अंजनी येथे शाळा तपासणीसाठी गेले होते. सतीश पवार व आशिष उनउने हे शिक्षक ट्रेनिंगसाठी गेले होते. तर शशिकला गायकवाड या लोकरेवाडी येथील वस्ती शाळेवर शिकवण्यासाठी गेल्या होत्या. उर्वरित 3 शिक्षकांवर 129 विद्यार्थ्यांची जबाबदारी होती.
शाळेत सगळा अनागोंदी कारभार सुरू
दोन-दोन वर्ग एकत्रित करून हे तीन शिक्षक केवळ विद्यार्थ्यांना अडवण्याचे काम करत होते. शिक्षणाचा अक्षरशः बोऱ्या उडाला होता. मी माहिती मिळताच तासगाव पंचायत समितीचे माजी सभापती संजय पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी शाळेत भेट दिली. त्यावेळी शाळेत सगळा अनागोंदी कारभार सुरू असल्याचे निदर्शनास आले.
केवळ 3 शिक्षकांवर 129 विद्यार्थ्यांची जबाबदारी
संजय पाटील व प्रवीण पवार यांनी याप्रकरणी गटशिक्षणाधिकारी आबासो लावंड यांच्याकडे तक्रार केली. लावंड यांनी केंद्रप्रमुख अमोल केंगार यांना तातडीने वडगाव शाळेत पाठवले. तोपर्यंत मुख्याध्यापक मोहन सौंदडे हेही शाळेत धावत-पळत आले. यावेळी केंद्रप्रमुख केंगार व मुख्याध्यापक सौंदडे यांना संजय पाटील व प्रवीण पवार यांनी धारेवर धरले. केवळ 3 शिक्षकांवर 129 विद्यार्थ्यांची जबाबदारी देऊन शिक्षणाचा खेळखंडोबा करता काय, असे म्हणून जाब विचारला.