
माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या पुतळ्याचे साताऱ्यात दहन; 'ते' वादग्रस्त विधान अंगलट येणार?
सातारा : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे एआयएमआयएम पक्षाचे नेते व माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा शिंदे-शिवसेना गटाच्या वतीने साताऱ्यामध्ये जोरदार निषेध करण्यात आला.
शिवसैनिकांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर जलील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गाढवावरून धिंड करून त्याचे दहन केले. तसेच त्याला जोडे मारो आंदोलन सुद्धा करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक निलेश मोरे तसेच इतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनामध्ये भाग घेतला होता.
काही दिवसांपूर्वी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी जातीचे राजकारण महाराष्ट्रात आणले, असे वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचे तीव्र पडसाद साताऱ्यात उमटले आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या वक्तव्याचा तीव्र पद्धतीने निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांनी या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून रोष व्यक्त केला.
दरम्यान, जलील यांच्या पुतळ्याला गाढवावर बसून त्याची धिंड काढण्यात आली आणि या पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. घडलेल्या या विधानाबाबत संबंधित नेत्यांनी शिवसेनेची माफी मागावी, यापुढे अशी वक्तव्य करू नयेत. अन्यथा शिवसेनेला आपल्या पद्धतीने आंदोलन करून योग्य ते उत्तर द्यावे लागेल, असा इशारा रणजितसिंह भोसले यांनी दिला. या वक्तव्याचा शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला.