याला काय म्हणावं? लग्नासाठी मुली मिळत नसल्याने विवाहितेशीच लावून दिलं तरुणाचं लग्न
बुलडाणा : शोधूनही लग्नासाठी मुली मिळत नसल्याने विवाहोत्सुक तरूण आता भामट्यांच्या जाळ्यात अडकत आहे. अशीच अजब लग्नाची ही गजब गोष्ट बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथे उघडकीस आला. आधीच विवाहित असलेल्या महिलेसोबत एका तरुणाचे लग्न लावून देण्यात आहे. आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस येताच तरुणाने पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तपास करून चौघांना बेड्या ठोकल्या, तर दोन जण पसार झाले.
अविवाहित तरुणांची फसवणूक करणाऱ्या मंडळीचे रॅकेटच असल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले. धाड येथील शैलेश (नाव बदलले) याने दिलेल्या तक्रारीनुसार, काही व्यक्तींनी त्याला लग्नासाठी मुलगी असल्याचे सांगून भरपूर पैसे व दागिने उकळले. नंतर अनिता (नाव बदलले) नामक विवाहितेशी त्याचे लग्न लावले. प्राथमिक तपासात प्रकरण फसवणूक करणारे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून लग्न लावल्याचे स्पष्ट झाले आहे. धाड पोलिसांनी अनितासह योगेश माधव थोरात, प्रतिभा ऊर्फ हिरा गांगुर्डे (रा. पेंढुर्ली, तालुका सिन्नर, जि.नाशिक) आणि साक्षी गणेश कालाप या चौघांना अटक केली आहे.
या प्रकरणातील नितीन भरत जमधाडे (रा. नाशिक) आणि अक्षय देवराज गजभरे (रा. पुसद, जि. यवतमाळ) हे दोघे फरार असून, त्यांचा धाड पोलीस युद्धपातळीवर शोध घेत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चार आरोपींना बुलढाणा येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. या चौघा आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तरुणांची फसवणूक करणरे रॅकेट सक्रिय
लग्नाच्या माध्यमातून तरुणांची फसवणूक करणारी टोळी राज्यात सक्रिय असल्याचे पोलिस तपासातून पुढे येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ठाणेदार आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे आणि त्यांच्या पथकाकडून केला जात आहे. पोलीस कोठडी दरम्यान चार आरोपींकडून त्यांनी यापूर्वी केलेले कारनामे, त्यांनी किती पालक आणि युवकांची फसवणूक केली, अशी किती लग्ने लावली याचा उलगडा होण्याची दाट शक्यता आहे.