
शिराळा शहराच्या विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर
शिराळा : शिराळा नगरपंचायत हद्दीतील विकासकामांसाठी लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने महायुती सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे शिराळा शहरातील विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंजूर कामे लवकरच सुरू होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आमदार सत्यजित देशमुख म्हणाले, शिराळा शहराला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा आहे. येथील जगप्रसिद्ध नागपंचमी, छत्रपती संभाजी महाराजांना येथील भुईकोट किल्ल्यावर सोडवण्याचा झालेला एकमेव प्रयत्न, समर्थ रामदास स्वामी स्थापित अकरा मारुतीपैकी एक मंदिर तसेच महायोगी गोरक्षनाथांचा या नगरीला लाभलेला सहवास हा आपला खरा खजाना आहे. त्या दृष्टीने शिराळा शहराला विकासात्मक पथावर नेणे हे माझे लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहे. त्यासाठीच हा निधी उपलब्ध झाला आहे.
ते म्हणाले, शिराळा येथे नाट्यगृह इमारत बांधणीसाठी ५ कोटी, शिराळा नगरपंचायत हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन बांधकाम करणे १.७५ कोटी, शिराळा नगरपंचायत हद्दीत नगरवाचनालय इमारत बांधकाम करणे १.२५ कोटी, शिराळा नगरपंचायत हद्दीत माजी सैनिक भवन इमारत भवन बांधकाम करणे ५० लाख, शिराळा नगरपंचायत हद्दीत श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसर विकसित करणे ५० लाख, शिराळा नगरपंचायत हद्दीत जुना औंढी रस्ता सुधारणा करणे ५० लाख, शिराळा नगरपंचायतसाठी कचरा प्रक्रिया व्हॅन युनिट (कचरा व्हॅन) उभारणे ५० लाख असे एकूण १० कोटी रुपये या विकासकामांसाठी मंजूर झाले आहेत.
दरम्यान, या कामांना लवकरच सुरुवात होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारने कायमचं सकारात्मक काम करून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्यामुळे हा भरघोस निधी मिळाला आहे. नागरिकांच्या हिताच्या कामांना प्राधान्याने निधी कमी पडू देणार नाही.
जनतेने ठेवलेल्या विश्वासास पात्र राहणार
जनतेने ठेवलेल्या विश्वासास पात्र राहून शिराळा मतदारसंघात विकासा कामे उभा केला जातील, असा विश्वास आमदार सत्यजित देशमुख यांनी व्यक्त केला. या अगोदर या शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊन बहुताशी कामे मार्गी लावण्यात आली आहे.