Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सव म्हटलं की मुंबईकरांना आठवतं ते ती सार्वजनिक गणपती. लालबागच्या राजापासून ते तेजुकाया आणि खेतावाडीचा राजा असो प्रत्येक मुंबईकर हा गणेशोत्सवात मोठ्या उत्साहाने सामील होत असतो. पण तुम्हाला माहितेय का मुंबईतील या सावर्जनिक गणपती मंडळापैकी असं एक मंडळ आहे जे एका क्रांतीकारकाच्या विचारांनी प्रेरित झालेलं आहे.
एक काळ असा होता की, देशाच्या तळागाळापर्यंत ब्रिटीशांची सत्ता होती. या अन्याय अत्याचाराला विरोध करण्यासाठी देश एक होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तळगाळातील लोक एकत्र येणं गरजेचं होतं. म्हणूनच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सावाची सुरुवात केली. जेणेकरुन गणपतीच्या सणानिमित्ताने विविध जाती धर्माचे लोक एकत्र येतील, संवादाची आणि विचारांनी देवाण घेवाण होईल. टिळकांचा हाच विचार अंगीकारत आजगायत ही पंरपरा सुरु ठेवणारं मुंबईतील सर्वात जुनं मंडळ म्हणजे रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणपती मंडळ.
काळा चौकीयेथील या मंडळाची खऱ्या अर्थाने स्थापना झाली ती 1940 मध्ये. मात्र असं जरी असलं तरी याची सुरुवात झाली ती 1937 मध्ये. टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या रंगारी बदक चाळीतील काही तरुणांनी एकत्र येत एका छोट्याशा खोलीत गणपती बसवला आणि परंपरा पुढे अखंडित सुरु झाली. सुरुवातीला या गणोशोत्सावासाठी रहिवाशांना एकत्र आणणं, हा गणेशोत्सव का सुरु करण्यात आला ते पटवून देणं, याकरिता बऱ्याच अडचणी देखील आल्या. कधी त्या वैचारिक होत्या तर कधी आर्थिक होत्या. मात्र हळूहळू बाप्पाच्या कृपेने माणसं जोडली गेली. त्यानंतर एकीचं बळ इतकं वाढच गेलं की, 1940 मध्ये रंगारी बदक चाळीचा हा बाप्पा मोठ्या पटांगणात विराजमान झाला.
तेव्हापासून ते आजपर्यंत अनेक चांगले बदल हा या मंडळात होत गेले. या टिळकांच्या विचारांचा पाया मात्र तसाच आहे. आजही या मंडळाच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाजप्रबोधनाची काम केलं जातं. संस्कती जपण्याबरोबच आपण ज्या देशात राहतो ज्या राज्यात राहतो त्या राज्याचं काहीतरी देणं लागतो हिच जाणीव ठेऊन रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणपती मंडळ कायमच शैक्षणिक क्षेत्रातील विविध समस्यांवर काम करतं. तसंच विविध एकांकिका स्पर्धा, वत्कृत्व स्पर्धांच आयोजन करतं जेणेकरुन मुलांची सर्वांगिणदृष्ट्या विकास व्हावा. टिळकांचा वारसा खऱ्या जपणारा असा हा रंगारी बदक चाळीचं सार्वजनिक गणपती मंडळ आहे.